ॲक्सिलरेटींग इंडिया : 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट’ या पुस्तकाचे उपराष्ट्रपतींनी केले उद्घाटन
नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२१
नागरीकांना वेळेवर आणि तत्पर सेवा देण्याच्या आणि त्याशिवाय त्यांच्यासाठीनागरिकांची सेवांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी आज भर दिला. सेवा देण्याऱ्या सध्याच्या नमुन्यांचे परिक्षण करून सर्वात चांगल्या जिल्ह्यातील उत्तम कार्यशैलीचे अनुसरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सेवा पोचवणे ही प्रत्येक सरकारी कार्यक्रमाची मुख्य बाब असल्याचे अधोरेखित करून विनाविलंब व्यवस्थित सेवा देण्याखेरीज सुधारणांना अर्थ नाही असे ते म्हणाले. थेट लाभ हस्तांतरण हा भारताच्या सर्वंकष व्यवस्था बदलांचे महत्वाचे वळण असल्याचा संदर्भ त्यांनी दिला.
सर्वसमावेशकतेचे महत्व अधोरेखित करत नायडू यांनी विकासात्मक कार्यक्रमाचे लाभ समाजाच्या सर्व स्तरापर्यंत विशेषतः काठावरील व सर्वात वंचित असलेल्यांपर्यंत पोचवण्यावर त्यांनी भर दिला. यासंदर्भात त्यांनी मागे पडलेल्या भागातील विकासाला चालना देणाऱ्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमांसारख्या वेगळ्या स्वरूपाच्या योजनेचे उदाहरण दिले. २०२४ पर्यंत जवळपास २० कोटी घरांपर्यंत नळाद्वारे पाणी पोचवण्याचे लक्ष्य असणाऱ्या सरकारच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची त्यांनी प्रशंसा केली.
‘ॲक्सिलरेटींग इंडिया : 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट‘ या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती निवास येथे करताना ते म्हणाले की, स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना सामान्य माणसाला मानाचे जीवन देण्याबाबत घटनेने दिलेल्या आश्वासनाची किती प्रगती झाली आहे त्याचे मुल्यमापन होणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तिगत वा सामाजिक पातळीवरील भेदभावाविना प्रतिष्ठित जीवन हे प्रजातंत्राच्या आरंभाला आपणच आपल्याला दिलेले वचन आहे. आणि ते सदैव लक्षात ठेवले पाहिजे असे त्यांनी सांगितले.