‘कोरोना’ संसर्ग काळात सन २०२२ या वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबद्दल कृती आराखडा तयार करा – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

पुणे प्रतिनिधि , दि.१२:- ‘कोरोना’ संसर्ग काळात सन 2022 या वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबद्दल कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली सन 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 व 12 वी च्या परीक्षा कार्यपद्धती ठरविण्याबाबत येथील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात बैठक पार पडली. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, माध्यमिकच्या शिक्षण उपसंचालक वंदना वाहुळ, प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदचे शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोडे, उपायुक्त हरुण अत्तार, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे  सचिव अशोक भोसले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर एक नवीन ‘शैक्षणिक चॅनेल’ तयार करण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे  प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री.कडू यांनी सांगितले.

शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, ‘कोरोना’ संसर्ग काळात परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येईल. तसेच कोरोना संसर्ग नसेल तर परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येईल याबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी दिले.  इयत्ता 10 व 12  वी च्या परीक्षेबाबत विद्यार्थी व पालक यांना लवकरात लवकर कळविल्यास परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करण्यास सोयीचे होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने आपापली मते मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *