मुखेड प्रतिनिधी,दि.२५ : सावळी गावात (दि.२३)शुक्रवारी वेळ अमावस्या (येळवस )सण उत्साहात साजरा झाला. शेतकरी कुटुंबासह आप आपल्या शेतात जाऊन येळवशीच्या वनभोजानाचा आनंद लुटला.
त्यामुळे शुक्रवारी दिवसभर गावात शुकशुकाट दिसून आला आहे. वेळ अमावस्या सणाची तयारी करताना तीन – चार दिवस अगोदर साधनाची जमावा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा आणि भाजी जसे अवरा, वांगे, कांद्याची पात, मेथी, असे सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात. वेळ अमावस्याच्या दिवशी पाहटेच्या वेळी घराघरात चूल पेटते. बेसन पिठात कालवून चिंच आणि आंबिवलेल्या ताकाच्या
पाण्यावर उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी म्हणजेच भज्जी (तुरीच्या शेंगाची) ही भज्जी व त्यासोबत दिले जाणारे अंबिल म्हणजे तीन -चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेली हे पेय ग्लासवर ग्लास पिल्यावर ही आणखी प्यायची इच्छा होते ते अंबिल, भाकरी, खीर, शेतात अंदाजे दहा – वीस लोक जेवण करतील एवढा स्वयंपाक वाजत – गाजत घरातून डोक्यावरून शेतावर निघतो.
वेळ अमावस्या (येळवस)हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वन भोजानाचा आनंद देणारा सण होय. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी आणि शेतीशी निगडीत सर्व कुटुंबीय हजेरी लावतात मित्र आणि नातेवाईकाना वन भोजणासाठी आमंत्रीत केले जाते. शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून माता लक्ष्मीची पुजा केली जाते तसेच सायंकाळी उत्तरपुजा केली जाते. त्या नंतर बालगोपाळसह महिलानी
येळवशीला भज्जी, भाकरी, खिर, अंबिल आणि तिळाची पोळीचा आस्वाद घेतला. एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन ते जिरावं यासाठी प्रत्येक खोपीच्या पुढे झोका बांधला जातो.त्या झोक्यावर बसून झोका खेळून झोक्याचा आनंद घेतला जातो.भारतसारख्या कृषीप्रधान देशात कृषीशी निघडीत अनेक सणवार असतात असाच एक म्हणजे वेळ अमावस्या हा सण होय या सणाला
आपल्या शेतातल्या काळ्या आईची ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावे पुजा केली जाते.वेळ अमावस्या हे सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जाते. वेळ अमावस्येला बोली भाषेत येळवस असे देखील म्हटले जाते वेळ अमावस्येच्या दिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्या काळ्या आईची पूजा केली जाते.