आदिवासी विकास विभागाशी आता मोबाईल ॲप्लिकेशन, वेबच्या माध्यमातून संवाद साधता येणार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

 

 

नंदुरबार,दि.२६ :-  बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आदिवासी विकास विभागाने योजनांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र टोल फ्रि क्रमांक कार्यांन्वित केला आहे. लवकरच बहुसंवादी मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टलची स्थापना करण्यात येणार असून, त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजना,उपक्रम यांची सर्व प्रकारची माहिती मिळविणे अधिक सोपे व सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

नवापूर तालुक्यातील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा नूतन शालेय इमारतींच्या उद्धटन व पायाभरणी समारंभात पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, जि.प.सदस्य सुनील गावित, सरपंच प्रियंका गावित, पं.स. सदस्य जैन्या गावित, भिमसिंग पाडवी, निलेश प्रजापती, प्रदिप वळवी, हरिष पाडवी, कांतीलाल गावित, एजाज शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता (आदिवासी) ए. पी.चौधरी, आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी एस. ए. काकडे, शैलेश पटेल, के.एस.मोरे,  यांच्यासह लोकप्रतिनिधी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामूहीक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती देण्यासाठी विभागामार्फत १८०० २६७ ०००७ हा टोल फ्री क्रमांक प्रजासत्ताक दिनापासून सुरु केला आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत या टोल फ्री क्रमांकावरुन मिळणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

 

मंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले की, मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टच्या माध्यमातून आता प्रशिक्षणार्थी आदिवासी उमेदवारांना अभ्यासक्रमाची नोंदणी केल्यापासूनच अभ्यास साहित्य आणि अनुषंगिक माहितीचा तपशील आणि त्याबाबत काही तक्रार असल्यास त्याचे निवारण तात्काळ करण्यात येणार आहे. संभाव्य नोकरी देऊ करणारे आणि नोकरी मिळवू पाहणारे कुशल आणि प्रशिक्षित आदिवासी उमेदवार या दोघांसाठी उपयुक्त प्लेसमेंट संबंधित सर्व सेवा एकाच जागी या माध्यमातून निर्माण होणार आहेत.

भरती करणारे त्यांच्या रिक्त जागांचे तपशील आवश्यक असलेल्या विशिष्ट कौशल्यांसह त्यावर पोस्ट करू शकतील. तसेच त्यांना तक्रार निवारणासह नोकरी देणाऱ्याचा अभिप्राय / रेटिंग मिळविण्यात मदत तसेच कुशल आदिवासी उमेदवारांना संभाव्य नोकरी देऊ करणाऱ्यांसोबत चॅट आणि व्हॉईस कॉल मोडद्वारे संवाद साधण्यासाठी मदत या ॲपच्या माध्यमातून होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.

 

 

टोल फ्री नंबरवर मिळणार…

✅ माहिती आणि मार्गदर्शनासाठी १८०० २६७ ०००७ निःशुल्क कॉल करता येणार.

✅ वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजनांची माहिती लगेच मिळणार.

✅ शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन मिळणार.

✅ कुठल्याही कार्यालयात न जाता सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत मिळणार माहिती व मार्गदर्शन

ॲपच्या माध्यमातून मिळणार…

✅ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना अभ्यासक्रमांची नोंदणी केल्यापासून अभ्यास साहित्याची माहिती मिळणार.

✅ तक्रार करता येणार व त्याचे निराकरणही तात्काळ होणार

✅ नोकरी देणारे व नोकरी इच्छुक आपली माहिती अपेक्षित कौशल्यांसह पोस्ट करणार.

✅ नोकरी देणाऱ्याकडून मिळणार अभिप्रायासह रेटींग.

✅ नोकरी देऊ करणाऱ्यांसोबत चॅट आणि व्हॉईस कॉल द्वारे संवाद साधण्यासाठी मदत होणार.

या इमारतींचे झाले पायाभरणी आणि लोकार्पण

✅ शासकीय आदिवासी आश्रमशाळा,भादवड येथील शालेय इमारतीचे पायाभरणी.

✅ शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवमोगरा येथील मुलींचे वसतीगृहाचे पायाभरणी.

✅ नवापूर शासकीय आदिवासी इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा शालेय इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह इमारतीचे पायाभरणी.

✅ शासकीय आदिवासी आश्रमशाळा, पानबारा मुलींचे वसतीगृह इमारतीचे लोकार्पण.

✅ शासकीय आदिवासी आश्रमशाळा, खडकी येथील मुलांचे / मुलींचे / कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण.

✅ शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह नवापूर इमारतीचे लोकार्पण.

✅ शासकीय आदिवासी आश्रमशाळा, धनराट येथील मुलींचे वसतीगृह इमारतीचे लोकार्पण.

✅ शासकीय आदिवासी आश्रमशाळा, खेकडा येथील मुलांचे / मुलींचे वसतीगृह इमारतीचे लोकार्पण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *