अकोला दि.२२ :- शासनाव्दारे सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवील्या जातात. या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा याकरिता ‘शासकीय योजनांची जत्रा’च्या माध्यमातून जिल्हा व तालुकास्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शासकीय योजनांच्या जत्रेच्या पुर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सर्व उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, विविध विभागांमार्फत राबवित असलेल्या योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही, त्या लाभार्थ्यांपर्यंत संबंधित विभागांनी शासकीय योजनांची जत्राच्या माध्यमातून पोहोचावे. याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर सर्व विभागांनी समन्वय साधून योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीरांचे आयोजन करावे.
तसेच सर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी व नियंत्रण करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर जनकल्याण कक्षांची स्थापना करावी. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार असून त्यांचा वेळोवेळी आढावा घेतल्या जाईल. शासकीय योजना प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी पार पाडावी.
जिल्हा व तालुकास्तरावरील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल याकरिता सर्व यंत्रणानी क्षेत्रीयस्तरावर नियोजन करावे, असेही निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यांनी शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.