दोन लाख तरूणांना मिळणार शासकीय नोकरी; रोजगाराच्या संधींसाठी आता शासन आपल्या दारी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

 

 

 

नंदुरबार,दि.१४ :- देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासन ७५ हजार तरूणांना शासकीय नोकरीत संधी उपलब्ध करून देणार होते, आता ही संधी सुमारे दोन लाख तरूणांना उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत  समुपदेशन व रोजगार मेळावा नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.

 

 

 

 

 

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी,  जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.एस. मानकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील, ऋषिका गावित, गिरीश बडगुजर, प्रा. रविकिरण पाटकरी, एस. बी. जाधव, निलेश गायकवाड, गोपाळ महाजन, प्रमोद महाले, रणजित गवांदे हे उपस्थित होते.

 

 

 

 

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ.गावित म्हणाले, ज्यांना नोकरीत संधी उपलब्ध होणार नाहीत त्यांनी नाराज न होता शासनाच्या अशा समुपदेशन मेळाव्यातून मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनाचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे. केवळ येथे रोजगाराच्या, शिक्षणाच्या संधींवरच मार्गदर्शन करून शासन थांबणार नाही तर, ज्यांच्या हातात कुशलता आहे, अशांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून १०० टक्के रोजगार दिला जाणार आहे.

 

 

 

 

 

 

केवळ नोकरीच्या भरवश्यावर न राहता आता तरूणांनी नोकरी देणारे उद्योजक म्हणून पुढे यायला हवे. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षणापासून थेट व्यवसाय, उद्योग उभारण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सवलती व अर्थसहाय्याच्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत, त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी केले आहे.

 

 

 

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमारस मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी व युवक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *