गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या

 

 

अमरावती प्रतिनिधी, दि. २९ :-  शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे.  तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन अविष्कारांचा वेध घेवून संस्थेने गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या केशवराव भोसले सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, माजी आमदार बी.टी. देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन,

 

 

 

 

 

महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, उच्च शिक्षण सहसंचालक नलिनी टेंभेकर, व्हीएमव्ही संस्थेच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होवून शतकोत्तर वाटचाल सुरु झाली आहे. संस्थेचा आजवरचा इतिहास देदीप्यमान आहे. अमरावती परिसर ही संताची भूमी आहे. येथे संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज तसेच शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सानिध्याने ही भूमी पावन झाली आहे.

 

 

 

 

 

स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष या महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्त्व येथे घडली. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी देशभर आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. विद्यार्थी घडविण्यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्‍त्वपूर्ण आहे. शिक्षणाचे स्वरुप सर्वस्पर्शी असावे. त्याचे सार्वत्रिकरण होणे आवश्यक आहे. ज्ञान ही कोणाची मुक्तेदारी नसून ज्ञान मिळवणे प्रत्येकाचा अधिकार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

 

 

 

 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले असून ते लवचिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरणाच्या युगात रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची सुरवात करण्यात येत असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

विदर्भातील कापूस, सोयाबीन, तूर, संत्री यांचे एकरी उत्पादन वाढावे, यासाठी नवीन वाण निर्मिती करण्यासाठी यावर संशोधन व्हावे. या परिसरात मोठया प्रमाणात खनिजे आहेत. त्यावर संशोधन करणासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. भविष्यकालीन तंत्रज्ञानाची पाऊले ओळखून शिक्षण संस्थानी अभ्यासक्रमात वैविध्य आणावे. येथील भौगोलिक स्थितीनुसार उत्पादनाला चालना मिळणाऱ्या संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. खारपाणपट्ट्यात

 

 

 

 

 

 

झिंग्यांचे उत्पादन घेतल्यास या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होईल. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर वाढवा. त्यामुळे इंधनाचा एक सशक्त व परवडणारा पर्याय उभा राहील. बांबूपासून इथेनॉल निर्मिती, कचऱ्यापासून रस्त्यांची निर्मिती, अशुद्ध पाण्याचा पुर्नवापर अशा विविध संकल्पनातून उत्पन्न वाढ व रोजगार निर्मिती होत आहे.  अशा बाबींचे अनुकरण करणे काळजी गरज असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.

 

 

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख यांनी संस्थेच्या निर्मितीपासून आजवर झालेल्या प्रगतीची माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या वऱ्हाडाचे भूषण ठरलेल्या ब्रिटिश काळातील किंग एडवर्ड कॉलेज व सध्याच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला आज शंभर वर्षे पूर्ण झाली असून १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही शासकीय

 

 

 

 

 

 

संस्था मागील शंभर वर्षापासून मध्य भारतातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून आपले स्थान अबाधित राखू शकली आहे. या महाविद्यालयाची इमारत भव्य दगडी स्वरुपात बांधलेली असून तब्बल १६८ एकरच्या परिसरात वसतिगृह, प्रशस्त निवासस्थाने भव्य प्रांगण अशी ही वास्तू आहे.

 

 

 

 

 

या संस्थेची सुरवात लोक वर्गणीतून झाली. या संस्थेला सन २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. संस्थेत आज सुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने या संस्थेला २१ विषयात आचार्य (पीएचडी) पदवीसाठी संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

 

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या स्मारकाच्या कोनशीलेचे श्री. गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच ‘संस्थेच्या पाऊलखुणा’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा वाठ यांनी तर आभार डॉ. साधना कोल्हेकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *