फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी

पुणे दि.२६ :- पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी पुणे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून घ्यावा. या योजनेची नोंद आयएमआयएस प्रणालीवर नसल्यामुळे योजनेसाठी सद्यस्थितीत निधी उपलब्ध होत नाही. यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी असे निर्देशही श्री.पाटील यांनी यावेळी दिले.

फुरसुंगी नळपाणीपुरवठा योजना अंतर्गत गुरुत्व नलिका वितरण व्यवस्था टाकून झाल्यानंतर रोड पूर्ववत करून देण्यासाठी निधी उपलब्ध करणे, नळपाणी पुरवठा योजनेचा रोड पूर्ववत करावयाच्या खर्चासह वाढीव खर्च पुणे महानगरपालिकेकडून घेणे, मंजूर योजनेतील पुणे महानगरपालिकेचा हिस्सा पैकी २२६ लक्ष रुपये पुणे महानगर पालिकेने त्वरित उपलब्ध करून देण्याबाबतही या बैठकीत निर्देश देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी, मुख्य अभियंता श्री. भुजबळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे कार्यकारी अभियंता वैशाली आवटे तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *