कोरोना टेस्टींगवर अधिक भर द्यावा

नाशिक दिनांक २६ : जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आहे तरी टेस्टींगवर अधिक भर देण्यात यावा, जेणेकरून बाधित रूग्णांना योग्य वेळेत उपचार होऊन प्रसार नियंत्रणात राहील अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी  दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. या बैठकीस नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतिष कुलकर्णी, मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा शेख, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण एकसमान राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजन करण्यात यावे. तसेच लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये याकरीता लसीकरण केंद्रांमधील लसींच्या उपलब्धतेबाबत दर्शनी भागात फलक लावण्यात यावेत, जेणेकरून लसीकरण केंद्रांवर गर्दी नियंत्रणात राहील.त्याचप्रमाणे डेंग्यू व चिकणगुनिया या आजारांबाबात ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करण्यात यावी तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर द्यावा. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील प्रत्येक गरजु रूग्णास रूग्णवाहिका उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील क्षयरोग रूग्णांची संख्या सर्वात कमी असल्याने त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिका आरोग्य यंत्रणा यांनी समन्वयाने जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी नवनवीन उपाययोजनांचा प्रस्ताव  सादर करावा, अशा सुचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी दिल्या आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रूग्णालय, राष्ट्रीय आरोग्य मिशन व महानगरपालिका यांनी कोविड कालावधीत केलेल्या कामांचा तसेच जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *