देगलूर दि.१५ :- खानापूर येथील घरकुल लाभार्थ्यांना ऑनलाइन च्या नावाखाली पैशाची मागणी केली जात असून या सर्व प्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणाऱ्या ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नागेश बक्कनवार यांनी केली आहे.
गटविकास अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खानापूर गावातील घरकुल पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे .अशा लाभार्थ्यांनी प्रत्येकी पाचशे रुपये ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे फर्मान ग्रामसेवकांनी सोडलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा संकल्प केला आहे .
त्या अनुषंगानेच ग्रामीण भागासह शहरात घरकुल योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवकाने विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हणटले आहे .पात्र घरकुल लाभार्थ्यांची विनामूल्य नोंदणी करण्याची त्यांना ताकीद देण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी श्री बक्कनवार यांनी दिला आहे.