देगलूर प्रतिनिधि दि.२६ :- भारत देश असामान्य महान व्यक्तींच्या कर्तृत्वावर टिकून आहे, सर्वसमावेशकता हा भारताचा स्वभाव आहे म्हणून भारत देश जगात महान आहे असे मत रा.स्व.संघ देवगिरी प्रांत संपर्कप्रमुख इंद्रजीत सिंह बैस यांनी, प.पू.गोळवळकर गुरुजी शैक्षणिक संकुलात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत श्रोत्यांना उद्देशून प्रतिपादित केले. परमपूजनीय गोळवलकर गुरुजी जयंती निमित्य आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे २७ वे पुष्प इंद्रजीत सिंह बैस यांनी गुंफले. याप्रसंगी भा.शि. प्र.संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर प्रमुख उपस्थिती लाभलेले देगलूर बिलोली- मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. जितेश अंतापूरकर,गिरीश वझलवार हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
व्याख्यानाची सुरुवात दीपप्रज्वललाने, प.पू.गोळवलकर गुरुजी, भारतमाता, पुण्य. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने तथा गिरीश दीक्षित यांनी सादर केलेल्या ‘नमन माधव चरण मे..’ या पद्या द्वारे करण्यात आली.
“स्व-बोध”.. या विषयातून बैस यांनी स्व-बोधाचे चार टप्पे स्पष्ट करताना हिंदू संस्कृतीच्या विविध महत्त्वपूर्ण बाबींना स्पर्श केला. जगात अनेक संस्कृती उदयास आल्या व लोप पावल्या पण, भारतीय स्व-बोध संस्कृती अंदाजे गेली ५००० वर्षे झाली जगात टिकून आहे. ती विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे असे मत प्रतिपादन केले. रामायण, महाभारतापासून ते चाणक्य,छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंद, सावरकर, यांच्या स्वबोध जाणिवेच्या कार्याची महती सांगून बैस यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.” गर्व से कहो हम हिंदू है..!!!”.. हाच आपला स्व-बोध. गो रक्षण, संतांची शिकवण आपणास स्व-बोधाकडे नेते असे ते म्हणाले.
प्रमुख उपस्थिती लाभलेले देगलूर बिलोली -मतदार संघाचे आमदार जितेश अंतापुरकर म्हणाले या व्याख्यानमालेतून गोळवलकर विद्यालयाने उचललेल्या सामाजिक जाणीवा प्रशंसनीय पथदर्शक आहेत. विद्यार्थ्यात, जनमानसात संस्काराची शिदोरी रुजवणारी आहे. रा. स्व. संघाची शिस्त,वेळेची कटिबद्धता, राष्ट्रप्रेम मला भारावून टाकते. प.पू. गोळवलकर गुरुजींचे विचार सर्वदूर पसरोत असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात.. परमपूजनीय गोळवलकर गुरुजींच्या नावाची पवित्रता जपत,वक्त्यांचे मनोगत मनात रेंगाळत साठवायचं असतं. मानसिक सुधारणा संस्काराद्वारेच संपन्न होऊ शकते. व्यक्तीच्या ठाई चिरंतन सेवाभाव असला पाहिजे असे मत डॉ. सुरेंद्र आलूरकर यांनी व्यक्त केले.गोळवलकर गुरुजींनी रेल्वेच्या डब्यालाच आपले घर मानून देश सेवा कार्यासाठी 33 वर्षे पूर्ण भारतभर प्रवास केला. स्वयंसेवकाने कसे घडले पाहिजे हे यातून आपल्याला शिकावयास मिळते असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात सुरेश कुलकर्णी यांनी गुरुजींच्या कार्याचा उलगडा केला.गेली २७ वर्षे अखंड चालत आलेल्या या व्याख्यान यज्ञात.. अर्जुन लेले,शरद खाडीकर,गिरीश वेलणकर,अशोक बांगर, इत्यादी अनेक प्रख्यात व्याख्यात्यांनी देगलूरकरांची मने जिंकली.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मंचावरील मान्यवरांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ,मुख्याध्यापकांच्या वतीने स्वागत- सत्कार करण्यात आला. वैयक्तिक पद्य सुरेखातोटावर, ऋणनिर्देश मु. संजय कुलकर्णी, सूत्रसंचालन राधिका पांचाळ, कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव, मिलिंद जोशी यांनी केले.
याप्रसंगी या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी गिरीश गोळे, प्रकाश चिंतलवार, संजय पाटील, गिरीश वझलवार, शिल्पाताई अटकळीकर, विविध पत्रकार बंधू -भगिनी, मा. विद्यालयाचे मु. संजय कुलकर्णी प्रा. विद्यालयाचे मु. दमन देगावकर,शिक्षक, विद्यार्थी, माता – पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अर्चना सुरशेटवार यांनी पसायदानाने केली. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक विद्यार्थी, व सेवक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.