राज्यातील गरजू व पात्र रुग्णांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून मदत करण्यात येत आहे. या कक्षाकडून मिळणारी मदत गरजू व पात्र रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण ठरत असून, अनेक गरजू रुग्णांना या निधीच्या माध्यमातून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यातही मागील सात महिन्यात ४८३ रुग्णांना ३ कोटी ९९ लाख ४९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले. नुकताच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राहणारा रंगनाथ संतराम पवार या २७ वर्षीय युवकाला अपघातात गंभीर झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया व उपचारासाठी १ लाख रुपयांची मदत कक्षाकडून करण्यात आली आहे.
ही योजना गरजू पात्र रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरत असून योग्य वेळी उपचारासाठी मदत तात्काळ करण्यात येत आहे. याबाबत रंगनाथ संतराम पवार यांच्या कुटूंबियानी या मदतीबाबत शासनाचे व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे आभार मानले आहेत.
लोहा येथील रंगनाथ संतराम पवार हा युवक घरची दोन एकर शेती करुन छोटे मेडीकलचे दुकान चालवितो. दैनंदिन कामकाज करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. अचानक काही दिवसांपूर्वी त्यांचा लोहा येथील शिवाजी चौक येथे त्यांच्या दुचाकीला अपघात होवून डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे कुटूंबियानी यांना तात्काळ नांदेड येथील यशोसाई क्रिटीकल केअर सेंटर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठी रुग्णांला जास्तीचे पैसे लागणार होते. एवढे पैसे रंगनाथ पवार यांच्या कुटुंबाकडे नव्हते. रुग्णांच्या घरात त्यांच्याशिवाय कमविणारे दुसरे कोणीही नाही.
नातेवाईकांनी पैशांची जुळवाजुळव करुन बाकीच्या पैशासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. या कक्षाकडे सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली व या युवकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, नांदेड यांच्याकडून 1 लाख रुपयांची आर्थीक मदत मिळाली अशी माहिती रुग्णांचे काका गोपाल पवार यांनी दिली. ही बाब आमच्यासाठी व आमच्या कुटूंबासाठी खूप समाधानकारक होती. या मदतीमुळे माझ्या पुतण्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याने तो आता सुखरुप आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नांदेड यांच्या मदतीमुळे माझ्यासारख्या अनेक गरजू रुग्णांना अडचणीच्या वेळी मदतीचा हा हात म्हणजे खूप मोठा आधार मिळत असल्याचे असल्यांचे रुग्णांच्या कुटूंबियांनी सांगितले. आमच्या सारख्या अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्तीला मोठा आजार, गंभीर अपघात झाल्यास अशा घटनेतून जीव वाचवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीना वेळप्रसंगी उसनवारी, घर, शेत गहाण टाकून पैशाची जुळवाजुळव करावी लागते. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नांदेड यांच्या मदतीमुळे आम्हाला उपचारासाठी १ लाख रुपयांची जी मदत झाली, यामुळे आम्ही शासनाचे खूप आभारी आहोत असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. ही मदत अर्ज केल्यानंतर व कागदपत्रांची पूर्ण पुर्तता केल्यानंतर तात्काळ देण्यात आली याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले.
राज्यभरात अशा अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष वरदान ठरत आहेत. जिल्हास्तरावर हे मदत कक्ष स्थापन झाल्यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मुंबई मंत्रालय येथे जाण्याची आवश्यकता राहीली नाही. त्यांना आता आपल्या स्वत:च्या जिल्ह्यातच मदतीसाठी अर्ज करता येत आहे. तसेच प्रस्तावाची सद्यस्थिती येथेच पाहण्यास मिळत आहे.
या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारावर मदत मिळते ?
कॉक्लियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्ती मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूंचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया,मेंदूचे आजार, हदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारावर मदत मिळते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज कसा करावा ?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज मिळवता येतो. आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण तपशील भरावा. अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मंत्रालय मुंबई येथे ईमेलद्वारे aao.cmrf-mh@gov.in सादर करावा. त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यावर कागदपत्रांची व पात्रतेची पडताळणी करुन मंजुरीनंतर मदतीची रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते.
अलका पाटील
उपसंपादक,जिल्हा माहिती कार्यालय,नांदेड