संपादकीय
“पूरसंकट, फोटोसेशन आणि जनतेचा रोष”
पूरग्रस्त भागात लोकांच्या जीवाशी वाचवायचे, त्यांच्या समस्या कमी करायच्या – हे काम अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते आणि नेत्यांचे आहे. मात्र, प्रत्यक्ष काम करण्याऐवजी अनेकजण केवळ पूर आल्यानंतर कॅमेऱ्यासमोर उभे राहून, फोटो काढून, सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी मिळवण्याच्या धावपळीत दिसतात. याला लोकांच्या भाषेत “स्टंटबाजी” म्हटले जाते.
प्रशासकीय यंत्रणा वर्षभर निष्क्रिय राहते आणि संकट ओढवले की “आपण जनतेसोबत आहोत” असे दाखवणारे फोटोसेशन सुरू होते. पण खरी जबाबदारी म्हणजे पूरग्रस्त गावांची पूर्वनियोजित यादी तयार करणे, आवश्यक उपाययोजना करणे, बंधारे व जलनिस्सारणाची कामे हंगामापूर्वी पूर्ण करणे — हे मात्र कोणी करत नाही. परिणामतः दरवर्षी तीच परिस्थिती, तोच आक्रोश, आणि तशाच आश्वासनांची पुनरावृत्ती.
यामुळेच जनता असंतोषाने म्हणते — “या अधिकाऱ्यांना गेंड्याची कातडी आहे.” लोकांच्या व्यथा, दुःख, हालअपेष्टा याचा परिणाम त्यांच्यावर होतच नाही.
अपवाद अर्थातच आहेत. काही अधिकारी, कर्मचारी मनापासून काम करून जनतेचा विश्वास संपादन करतात. त्यांचे कौतुक व्हायलाच हवे. पण बहुसंख्यांमध्ये कामचुकारपणा, भ्रष्टाचार, दिखाऊपणा, आणि “प्रसिद्धी मिळवण्याची घाई” हेच प्रमुख झाले आहे.
नेते, कार्यकर्ते यांचेही चित्र तसेच आहे. जनतेची सेवा करण्याऐवजी संकटाच्या काळात चर्चेत राहण्यासाठी स्पर्धा सुरू असते. फोटोसेशन, बातम्या, सोशल मीडिया पोस्ट — हेच त्यांच्या कामगिरीचे मोजमाप बनले आहे.
जनतेच्या जीवाशी, मालमत्तेशी, भावनांशी खेळणाऱ्या या दिखाऊ वृत्तीवर थेट बोट ठेवणे आवश्यक आहे. समस्या संपवण्याचा मार्ग एकच — वेळेत नियोजन, प्रत्यक्ष काम, आणि पारदर्शक प्रशासन. अन्यथा दरवर्षी पूर येईल, दरवर्षी फोटो येतील, पण जनतेच्या डोळ्यातून प्रशासन व नेतेमंडळींचा विश्वास कायमचा वाहून जाईल.
सध्या देगलूर तालुक्यामध्ये अशा नेत्या व अधिकाऱ्या ंच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत जे की कामाचे श्रेय लाटून घेणे मध्ये मग्न आहेत अशा नेत्याकडून आज जनता अपेक्षा करते ती फक्त एकच: काम करा, फोटो नाही.