“हैदराबादहून प्रकाशित झालेला मराठीचा झेंडा — ‘साहित्यवड दिवाळी अंक 2025’ प्रकाशन सोहळा अभिजात मराठी भाषा सप्ताहात रंगला”
अभिजात मराठी भाषा सप्ताह (३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५) या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सर्व मराठी संस्थांना विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषा जपण्याचे, साजरे करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हैदराबाद येथील ‘साहित्यकट्टा’ या समूहाने एक अनोखा उपक्रम राबवला — डिजिटल स्वरूपातील एकमेव दिवाळी अंक ‘साहित्यवड दिवाळी अंक २०२५’ याचे प्रकाशन.
हा अंक अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आला. प्रकाशन समारंभ आय.सी.एम.आर. – एन.आय.एन. या संस्थेच्या डायरेक्टर डाॅ. भारती कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला.
या अंकात एकूण ५७ लेख, कथा, कविता, व्यक्तिचित्रे, मुलाखती आणि रेखाटने समाविष्ट असून तो मराठी साहित्याच्या विविध रंगांनी सजलेला आहे. यातील सर्व लेखक हैदराबाद येथे वास्तव्यास असून मराठी भाषेच्या प्रेमापोटी एकत्र आलेले आहेत हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
कार्यक्रमस्थळी पोहोचताच झेंडूच्या माळांनी सजवलेले प्रवेशद्वार आणि प्रत्येक महिलेला दिला जाणारा मोगर्याचा गजरा यामुळे संपूर्ण सभागृह सुगंधित झाले होते. संध्याकाळी पाच वाजता डाॅ. भारती कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
व्यंकटेश कुलकर्णी यांनी फेसबुक लाईव्हद्वारे हा कार्यक्रम उपस्थित राहू न शकलेल्या सदस्यांपर्यंत पोहोचवला. दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी विनय जोशी, श्रीकृष्ण चिकाटे, विवेक देशपांडे, प्रकाश धर्म आणि अरुण डवलेकर यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले.
अभिलाषा कुलकर्णी यांनी संपादकीय भाषणातून दिवाळी अंकाची ओळख करून दिली. अंकाचे मुखपृष्ठ रश्मी नेमीवंत यांनी साकारले असून त्यावरील मनोगत नितीन बसरूर यांनी सुंदर शब्दांत सादर केले.
निवेदिका प्रीती पांडे यांनी डाॅ. भारती कुलकर्णी यांचा प्रभावी परिचय करून दिला. त्यांच्या भाषणात त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या मुलाखतीचा सविस्तर मजकूर दिवाळी अंकात प्रकाशित आहे.
अंकातील काही लेखांचे वाचनही कार्यक्रमात सादर करण्यात आले.
उज्वला धर्म यांनी विद्या देवधर लिखित “भारतीय स्वातंत्र्याचा महामंत्र वंदे मातरम” हा लेख सादर केला, अवधूत कुलकर्णी यांनी “वेळेचा दट्ट्या” ही कविता, तर प्रवीण कावडकर यांनी “सोयरीक जोडणारा बुवा” ही विनोदी कथा सादर करून उपस्थितांना हसवले.
कांचन जतकर यांनी “असे काहीतरी करा देवा” ही हृदयस्पर्शी कविता सादर केली, तर डाॅ. पर्सी अवारी यांच्या “गिधाडे आणि त्याचे संवर्धन” या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. मेघा देशपांडे यांनी डाॅ. नयना जोशी यांच्या “ऋषीस्मरण” या लेखावर भाष्य केले, आणि संदीप केळकर यांनी “आर.सी.ए. बॉम्ब” या लेखातील संकल्पना रसिकांसमोर उलगडली.
आरती कोडग यांनी “का कुणास ठाऊक” ही कथा सादर केली, तर अदिती खांडेकर यांनी “युनायटेड वे ऑफ हैदराबाद” या सामाजिक संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे निवेदन प्रीती पांडे आणि आरती कोडग यांच्या जोडीने सुंदररीत्या पार पाडले. शेवटी सर्व आयोजकांना भेट म्हणून चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अवघ्या चार दिवसांत दिवाळी अंक पीडीएफ आणि वर्डप्रेस या दोन्ही स्वरूपात प्रकाशित करण्याचे श्रेय अभिलाषा कुलकर्णी आणि अवधूत कुलकर्णी यांना जाते. साहित्यवड टीमच्या परिश्रमांना उपस्थित सर्वांनी दाद दिली.
या कार्यक्रमाने केवळ एक दिवाळी अंक नव्हे तर मराठी भाषेचा सन्मान, जिव्हाळा आणि एकतेचा सुगंध पसरवला.
— अरुण डवलेकर
सदस्य, साहित्यवड दिवाळी अंक टीम
9966375011
