राज्यपालांच्या हस्ते हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान.

मुंबई, दि. ०८ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते देशासाठी कर्तव्य बजावित असताना वीरमरण प्राप्त झालेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

राजभवन येथे मंगळवारी (दि. ७) कलाकार व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना २७ वे लायन्स गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ५ हुतात्मा जवानांच्या परिवारांना शैक्षणिक सहकार्य म्हणून प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. लायन्स क्लब मुंबई एसओएल तर्फे हे पुरस्कार तसेच मदतीचे धनादेश देण्यात आले.

हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने भारतमातेचे स्मरण करून देशासाठी योगदान दिले तर भारत जगतगुरु होईल. कोरोनाच्या संकटकाळात देशाने ज्या एकीने काम केले तशी एकी कायम ठेवली तर देश निश्चितपणे आत्मनिर्भर होईल.

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, पार्श्वगायक कुमार सानू, अभिनेते बॉबी देवल, अभिनेत्री दिव्या खोसला, अभिनेत्री कृष्णा श्रॉफ, एली अवराम, झोया हसन, डॉ अनिल मोरारका, सिमरन आहुजा, डॉ राम जव्हारानी यांसह ३० जणांना यावेळी लायन्स क्लब एक्सलंस पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक इंद्रेश कुमार, उद्योजक रोहित गरोडिया व लायन्स इंटरनॅशनलचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजू मनवाणी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *