सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन

     

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थितीत राहणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई                                                                                                 कोकण विकासास चालना मिळणार. 

मुंबई, दि. ०९ : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

श्री.देसाई यांनी सांगितले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन या विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण २८६ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली. सुमारे ५२० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स  तसेच ऑपरेशन्स (DBFO) साठी लीजवर हे काम देण्यात आले आहे. त्यांनी हा खर्च केला आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्‍या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एम आयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी एम आयडीसीच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

विमान पत्तन प्राधिकरण, (Airport Authority of India)  नागर विमानन माहानिदेशालय (DGCA) यांच्या तर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमानवाहतुक सुरु झाल्यामुळे अधिकाधिक पर्यटकांना पोहोचता येईल. कोकणवासियांच्या उत्कर्षाचा काळ सुरु झाला आहे, असेही श्री.देसाई यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *