औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • निजामकालीन शाळांचे रुपडं पालटणारशहरांतील रस्ते सुधारणार

  • पैठणचे संतपीठ लवकरच सुरूऔरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गालाही चालना

मुंबई, दि. १०  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप आता बदलणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारणार असून सातारा-देवळाईमधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत औरंगाबादच्या विविध विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्याच्या संस्कृतीचे प्रतीक असणारे श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे संत परंपरा आणि साहित्याच्या अभ्यास-संशोधनाला चालना मिळणार आहे. औरंगाबाद- अहमदनगर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून, हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचे सादरीकरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. वर्षा येथे झालेल्या या सादरीकरणास औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.

 

संतपीठ हे विद्यापीठ व्हावे

पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज संतपीठाची इमारत तसेच वसतिगृह तयार आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू झालेला नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या संत साहित्याच्या अभ्यासकांना एकत्र बोलावून चर्चा व्हावी. तसेच अशांच्या सहभागाने ट्रस्टची पुनर्रचना करावी. राज्याच्या संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या या संतपीठात शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. हे संतपीठ विद्यापीठ व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अधिक पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

निजामकालीन शाळांचे रूप बदलणार

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील १४४ शाळांच्या इमारती निजामकालीन असून, त्यातील बहुतांश मोडकळीस आलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या शाळांच्या पुनर्बांधणी आणि दुरूस्तीचा शाश्वत कार्यक्रम हाती घेऊन ठोस आणि चिरकाल टिकणारी गोष्ट करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

औरंगाबाद शहरातील रस्ते सुधारणार

यावेळी मनपा आयुक्त श्री. पांडे यांनी शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये आणि शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी आवश्यक असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी ही कामे तातडीने नगरविकास विभागास महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

 

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन

यावेळी औरंगाबाद शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन  उभारणीच्या कामाचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच हे स्मृतिवन  स्थानिक वृक्षसंपदेच्या जतनासाठी तसेच पक्षी उद्यान म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

गुंठेवारीची प्रकरणे वेगाने सोडवा

महापालिका आयुक्तांनी औरंगाबादमध्ये गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला असून, ५२ संस्थामार्फत विभागनिहाय प्रस्ताव प्राप्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्यावर गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

 

औरंगाबाद सफारी पार्क

औरंगाबाद सफारी पार्क जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क होण्यासाठी तसे वेगळेपण निर्माण करावे, विविध प्राणी त्याठिकाणी असावेत या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत सूचना दिल्या. प्राणी उद्यान व सफारीसाठी जमिनीची मागणी महापालिकेने केली आहे. त्यादृष्टीने वन विभागाच्या समन्वयाने ही कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.

 

औरंगाबाद – अहमदनगर रेल्वे मार्ग

सध्या औरंगाबाद-मनमाड-अहमदनगर असे २६५ किलोमीटरचे रेल्वेचे अंतर आहे. याला पर्याय म्हणून औरंगाबाद – अहमदनगर अशी ११२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला असून हा मार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि व्यापारास चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले. डीएमआयसी आणि ऑरीक सिटीमधील उद्योगाशी निगडीत मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सध्या रस्ते मार्गे होते. ती या प्रस्तावित रेल्वेमार्गे झाल्याने वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्याची व्यवहार्यता तपासली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल असे सांगितले.

 

औरंगाबाद – शिर्डी हवाई मार्ग

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद ते शिर्डी हे ११२.४० किलोमीटरचे काम वेगाने पूर्ण होत असून औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद-शिर्डी या मार्गावर विमान सेवा सुरु झाल्यास पर्यटकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असून, याही पर्यायाचा विचार करावा असे सांगितले.

 

घृष्णेश्वर मंदिर विकाससिथेंटिक ट्रॅकसाठी ग्रीन सिग्नल

घृष्णेश्वर मंदिर परिसरातील सभामंडपाच्या बांधकामासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश दिले. तसेच विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकचे काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करावी असेही सांगितले.

 

विकास कामे वेगाने पूर्ण करणार – पालकमंत्री श्री. देसाई

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेकडील निजामकालीन इमारतीतील शाळांची दुरूस्ती करून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामे वेगाने पूर्ण करताना, त्याचा दर्जा टिकवून ठेवला जाईल. जिल्ह्यातील उद्योग, कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोजगार हमी योजना मंत्री श्री. भुमरे, महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार तसेच आमदार श्री. शिरसाट यांनी देखील विकास कामांसंदर्भात सूचना केल्या.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी प्रगतीपथावरील तसेच विविध प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *