सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा

मुंबई, दि . १३  : मुंबई विद्यापीठाने गणेशोत्सव सुरु असतानाच आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरणस्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी व आदर्श शैक्षणिक परिसर होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे व रत्नागिरीनंतर विद्यापीठाचे सिंधुदुर्ग हे तिसरे उपकेंद्र आहे.

उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत व कुलगुरू सुहास पेडणेकर दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विद्यापीठातील तसेच देशविदेशातील तज्ज्ञ व प्राध्यापकांना सिंधुदुर्ग परिसर येथे निमंत्रित करावे व तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे. कालांतराने सिंधुदुर्ग उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजे, अशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपकेंद्राला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *