नांदेड दि. १८ :- मराठवाडा मुक्तीचा लढा हा जात धर्म पंथ यांच्यापलीकडे सार्वभौम प्रजासत्ताकासाठी, लोकशाहीची मूल्य जपली जावीत यासाठी होता. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मराठवाडा मुक्तीचा हा लढा दिला. हा लढा कोण्या एका जातीच्या विरोधात नाही तर लोकशाहीला मारक असलेल्या प्रवृतीच्या विरोधात होता, मानवी मूल्यासाठी होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७३ वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, विधानपरिषद सदस्य अमर राजुरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदी उपस्थित होते.
ज्या लोकशाही मूल्यांसाठी महात्मा गांधी आग्रही होते, त्याच लोकशाही मूल्यांपासून प्रेरणा घेवून स्वामी रामानंद तीर्थ घडले. मराठवाडा मुक्तीचा हा लढा लोकशाही मूल्यांसाठीचा लढा होता. एका बाजुला भारताला स्वातंत्र्य देताना दुसऱ्या बाजुला ब्रिटिशांनी हैदराबादसह असंख्य संस्थाने तशीच ठेवून त्यांना मर्जीप्रमाणे कारभाराची मुभा दिली. त्याकडे आपण अभ्यासूवृत्तीने पाहिले पाहिजे. मुळात अखंड भारतात फूट पाडण्याची ती राजनिती होती. अलीकडच्या काळात इतिहासातील संदर्भाचे वाचन हे ठराविक जातीच्या चौकटीतून मांडण्याचा प्रघात वाढीस लागला आहे. नव्या पिढीपासून जर इतिहासाच्या पानातील सत्य दडवून ठेवले तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
लोकशाही मूल्यांतील लोककल्याणकारी राज्याचा संकल्प महाराष्ट्राने घेतला आहे. हे राज्य लोककल्याणाचे आहे या कर्तव्यनिष्ठेला आपण प्राधान्य दिलेले आहे. यातूनच लोकाभिमूख प्रशासनाचा पाया भक्कम झालेला आहे, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनासह जी विविध आव्हाने निर्माण झाली आहेत त्यात नैसर्गिक आपत्तीची, पर्यावरणातील असमतोलाची, अतिवृष्टीची, वातावरणातील आमूलाग्र बदलाच्या आव्हानांची भर पडली आहे.
गेल्या जुलैपासून अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटात नांदेड जिल्ह्यात २५ व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत. हजारो हेक्टर भूमी पुराच्या पाण्याने खरडून गेलेली आहे. अनेक शेतकरी उद्ध्वस्त होवून पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. शासन अशा सर्व शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरतेने उभे असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.