Warning: Array to string conversion in /home/u350072333/domains/mahimakhadicha.com/public_html/wp-includes/formatting.php on line 1096

अतिवृष्टी आणि कोरोना आपत्तीतील संकट काळात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमधून जिल्ह्यात सकारात्मक काम.

बीड, दि.१८:–  अतिवृष्टी आणि कोरोना आपत्तीतील संकट काळात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमधून जिल्ह्यात सकारात्मक काम होत आहे. ग्रामीण भागाची देखील विकासाकडे वाटचाल होत असून आपल्या सगळयांसह पुढील काळात देखील येणाऱ्या आपत्तींवर मात करुन विकासाची  वाटचाल करु असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ पोलीस मुख्यालय मैदान बीड येथे संपन्न झाला.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक आर राजा,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी  निमंत्रित उपस्थित होते. पालकमंत्री श्री. मुंडे यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ते  म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळापर्यंत आपला मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्य लढ्यात निजामाच्या हैद्राबाद संस्थानातील मराठवाड्याच्या जनतेने हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला. या लढयात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे असे अनेक वीर या मुक्ती संग्रामात हुतात्मा झाले. यामध्ये बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र विठ्ठलराव काटकर यांचे नाव घेताना मला अभिमान वाटतो अशी भावना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

मंत्री महोदय म्हणाले, संत भगवानबाबांनी ग्रामीण मराठवाड्यात शिक्षण प्रसारासाठी प्रबोधनाचा मार्ग वापरला. त्यांच्याच कार्य प्रेरणेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत घेतला आहे. यातून महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील ४१ तालुक्यात ८२ वसतिगृहे सुरु करणार आहोत, त्यापैकी बीड जिल्ह्यात या वर्षी १२ वसतिगृहे सुरु करण्यासाठी तरतूद केली आहे. या वसतिगृहांसाठी इमारती अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, असे सांगितले,

ते म्हणाले, अतिवृष्टी आणि पूरामध्ये शेती बरोबर जनावरे, रस्ते- पूल, घरांचेही नुकसान झाले. काहींना नदीच्या पूरामध्ये सापडल्याने जीव गमवावा लागला. प्रत्येक मयत व्यक्तींच्या कुटुंबास शासनाच्या वतीने चार लाख रुपये मदत दिली जात आहे. माजलगाव, वडवणी व बीड तालुक्यातील पाच कुटुंबांना ही मदत तातडीने देण्यात आली आहे. तर जनावरे, घरे इतर नुकसानीच्या मदतीचा पंचनामे होऊन शासनाकडे निधीची मागणी करणे व अन्य प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरु आहे असे मंत्री श्री. मुंडे म्हणाले.

यावेळी उपस्थित मान्यवर व निमंत्रितांची भेट घेऊन पालक मंत्री श्री.मुंडे यांनी सदिच्छा दिल्या. 

हुतात्म्यांना श्रद्धांजली

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रियदर्शनी उद्यान बीड येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या सशस्त्र पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

याप्रसंगीआमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक आर.राजा,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या सह उपस्थित पदाधिकारी अधिकारी व मान्यवरांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी  पालक मंत्री श्री.मुंडे यांनी स्वातंत्र्य सैनिक श्री मारुती भाऊराव सानप व श्री. विठू किसनजी गायके तसेच उपस्थित मान्यवर व निमंत्रितांची भेट घेऊन सदिच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *