परभणी, दि. २५ :- आरोग्य विभागाच्या दिनांक २५ व २६ सप्टेंबर रोजी गट क व ड पदांसाठी होणाऱ्या परीक्षा संदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी येथील नूतन विद्यालय या परीक्षा केंद्राला प्रत्यक्ष भेट देवून सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आदी बाबींची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रकाश डाके उपस्थित होते.
श्री. टोपे म्हणाले की, साधारणता ६ हजार २०० पदांसाठी ८ लाख विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. ही परीक्षा १हजार ५०० केंद्रावर होणार आहे. परीक्षार्थ्यांना प्रवेश पत्राबाबत अडचण आली तर ई-मेल, व्हॉटसअपवर अडचण दूर केली जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राधिकृत केले असून यांच्यामार्फत देखील प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. या परीक्षा अत्यंत पारदर्शक होणार असून परीक्षार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी श्री. टोपे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देवून ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्टची पहाणी केली. येथील नवजात शिशु दक्षता कक्षास भेट देवून पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.