ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डेस्टिनेशन कोल्हापूर, कोल्हापूर टुरिझम या लोगोचे अनावरण
-
डेस्टिनेशन कोल्हापूर हा ब्रँड जागतिक स्तरावर पोहचला पाहिजे
-
फुड कॅपिटल म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
-
येणाऱ्या पाच वर्षात पर्यटनातून कोल्हापूर जिल्ह्याची समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे
-
पर्यटन सप्ताहाचे आयोजन करून लोकांमध्ये पर्यटनाबाबत जनजागृती साठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून कौतुक
कोल्हापूर, दि.२८:- कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक, प्राचीन, नैसर्गिक व आधुनिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत. या पर्यटन स्थळांसोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, क्रीडा, कला, उद्योग, कृषी व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची माहितीही येथे येणाऱ्या पर्यटकांना द्यावी. प्रशासनाने येथील पर्यटन स्थळांची माहिती योग्य पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचविल्यास ‘कोल्हापूर जिल्हा पर्यटन’ आता देश पातळीवर ‘नंबर एक’चा जिल्हा होईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दिनांक २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, राजेश पाटील, जयंत आसगावकर, चंद्रकांत जाधव तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पर्यटन विभागाचे दीपक हरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांनी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ चे ब्रँडिंग करावे – पालकमंत्री सतेज पाटील
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनात प्रचंड संधी आहे. जागतिक स्तरावर पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचे ब्रॅण्डिंग करून कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक विविध ऐतिहासिक, नैसर्गिक व आधुनिक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ चे ब्रँडिंग करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, प्रशासन व खाजगी उद्योजक व्यावसायिक यांनी प्रत्येक ठिकाणी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ हा ब्रँड वापरावा. या ब्रँडचे डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ब्रॅण्डिंग होऊन पर्यटक येथे आकर्षित झाले पाहिजेत. येथील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कल्पकता असून खाद्यसंस्कृती ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुढील काळात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख ही महाराष्ट्राची ‘फूड कॅपिटल’ अशी झाली पाहिजे, असे पालकमंत्री पाटील यांनी सूचित केले.
पर्यटनामधून अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांचे मोठ्या प्रमाणावर सादरीकरण करून पुढील पाच वर्षात जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देऊन समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त पर्यटक कशा पद्धतीने येऊ शकतील, यासाठी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर प्रशासनाने पर्यटन जनजागृती सप्ताह आयोजित करून निमंत्रित लोकांना पर्यटन घडवून आणणे व त्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांमध्ये पर्यटनावषयी जनजागृती निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करून सर्व कोल्हापूरवासीयांनी एकत्रित येऊन ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ चे ब्रँडिंग करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
जिल्ह्यात ऐतिहासिक, नैसर्गिक पर्यटनाला मोठ्या संधी असून पर्यटनात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात येतील, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगून केंद्र शासनाकडून येथील विकास कामासाठी निधी आणला जाईल. तसेच येथील विमानतळ सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला पर्यटन जनजागृती सप्ताह ही एक चांगली सुरुवात असून पुढील काळात पर्यटनातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या प्रेरणेतून व जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन जनजागृती सप्ताह दिनांक २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत राबवला जात आहे. या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व समावेशक पर्यटन धोरण ठरविण्यात येणार असून यासाठी त्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचा सहभाग घेऊन प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
प्रारंभी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर डेस्टिनेशन या लोगोचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर टुरिझम या लोगोचे अनावरण करण्यात आले. या लोगो मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरातील इंग्रजी व मराठीतील कोल्हापूर या नावाचा वापर करण्यात आला आहे.
कोल्हापूर फेस्टिवल या कॅलेंडरचे अनावरण खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूरच्या पर्यटन वेबसाइटचे अनावरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर कोल्हापुर टुरिझझमचे अनावरण शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील विविध वैशिष्ट्ये असलेल्या स्टँडी चे अनावरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताहास मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव, मोहन जोशी व श्रेयस तळपदे यांनी दिलेल्या शुभेच्छांची चित्रफित दाखवण्यात आली. तसेच राधानगरी अभयारण्यावर तयार करण्यात आलेली चित्रफीत मान्यवरांना दाखवण्यात आली.
प्रारंभी सर्व मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उज्वल नागेशकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.