- संत्रा उत्पादकांच्या समस्या फिल्डवर जाऊन सोडवा
- संत्रा उत्पादकांच्या मागणीनुसार शासन मदत करेल
- दुर्गम भागाला दूरस्थ पध्दतीने ( ऑनलाईन ) मार्गदर्शन करा
नागपूर दि. २८ : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या सुखदुःखाला समजून घेत आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे त्यांच्या समस्या माहिती आहे. या समस्यांवर समाधान शोधणे गरजेचे असून संत्रा फळाच्या गळतीमुळे उत्पादक सध्या त्रस्त आहे. यावर संशोधन झाले पाहिजे. नेमके ईलाज शोधले गेले पाहिजे. त्यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या संस्था मिळून दर महिन्याला कार्यशाळा आयोजित करतील, असे निर्देश राज्याचे पदुम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले.
भारतीय कृषी अनुसंधान केंद्र अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था (आयसीएआर-सीसीआरआय) मार्फत आयोजित फळ गळती व्यवस्थापन कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर आयसीएआर -सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष, आयसीएआरचे फळबाग विभागाचे उपमहासंचालक डॉ. बी. के. पांडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संशोधन विभागाचे संचालक डॉ. विलास खर्चे, सीसीआरआयचे प्रमुख संशोधक डॉ. आर. के सोनकर, नागपूर कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई सहसंचालक शंकर टोटवार आदी मान्यवरांची उपास्थिती होती.
अमरावती व नागपूर विभागातील संत्रा उत्पादक या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विभागातील काही भागात खराब हवामानामुळे फळगळ दिसून आली आहे. भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने या परिस्थितीत संत्रा व मोसंबी फळबागेत पावसाळ्यातील फळगळतिचे व्यवस्थापन करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील केदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील केदार यांनी, कोरोना काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद असतांना भारतीय शेतकऱ्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीला हातभार लावल्याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले. नागपूर परिसरातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांचा आपला अभ्यास आहे. मात्र यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. यासाठी ‘सीसीआरआय’ मार्फत उत्तम दर्जाच्या कलमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तसेच नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठ मिळाली पाहिजे. या दृष्टीने संशोधन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या समस्या आज समजावून घेत त्यावर उपाय काढण्याचे यावेळी त्यांनी निर्देशित केले.
क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल. त्यासाठी या केंद्राचे मार्गदर्शन घ्यावे, दुर्गम भागात जाणाऱ्या शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन ऑनलाइन देखील केले गेले पाहिजे, आजच्या बैठकीत शेतकऱ्यांनी सध्याच्या फळं गळतीवर नेमके उपाय काय उपाय आहेत. यावर चर्चा करावी, असे त्यांनी यावेळी निर्देशीत केले.
शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील संवादाला मंत्र्यांनी उपस्थित रहावे. आता वेळ द्यावा. प्रश्नामध्ये हस्तक्षेप करावा, यासाठी काही शेतकऱ्यांनी कार्यक्रमातच उभे राहून विनंती केली. त्यामुळे मार्गदर्शनासाठी आलेल्या मंत्र्यांनी पूर्वनियोजित दौरा पुढे ढकलत शेतकऱ्यांच्या समस्या या वेळी ऐकून घेतल्या. नागपूर व अमरावती विभागातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी उपस्थित सर्व प्रश्नांवर तोडगा काढत आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यातील प्रश्नोत्तराच्या सत्रात स्वतः हस्तक्षेप करीत कालमर्यादेत समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देशित केले. यावेळी विविध साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. आर. के. सोनकर यांनी केले.
संत्रा उत्पादकांच्या मागण्याशेतकऱ्यांना सीसीआरआयने कलमा उपलब्ध कराव्या.
अनुदान नको मात्र उपयोगी मार्गदर्शन करण्याचे आवाहन. संत्रा उत्पादनातील इस्त्रायल व स्पेनच्या जाती आयात करण्यात याव्यात. फळ पिकावर येणाऱ्या कीड-रोगांचे परिक्षण करण्यात यावे. प्रत्येक शेतकऱ्याला संत्रा उत्पादना संदर्भातील पुस्तिका देण्यात यावी. माती परीक्षण प्रत्येक तालुकास्तरावर करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी. क्रॉप न्यूट्रिशनकडे विद्यापीठाने लक्ष घालावे. पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकाप्रमाणे दबावगट तयार व्हावा |