ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेवाचून यापुढे हेळसांड होणार नाही, यासाठी गरज पडल्यास आणखी रुग्णवाहिका देऊ

बीड , दि. २८ :- ग्रामीण भागात रुग्णांना योग्य आरोग्य विषयक सुविधा व वेळेवर उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागास ३१ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास आणखी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होणार नाही, याकडे पुढील काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागास विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर देण्यासाठी तब्बल ३१ नवीन सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका आज दाखल झाल्या असून, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज या रुग्णवाहिकांचे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानात लोकार्पण करण्यात आले. बीड जिल्ह्यात इतक्या संख्येने एकत्रित रुग्णवाहिका मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर जिल्हा रुग्णालयांतर्गत विविध उपजिल्हा रुग्णालय येथे देण्यासाठी आणखी १२ रुग्णवाहिका मंजूर असून, येत्या आठवडा भरात त्या १२ रुग्णवाहिका देखील जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री श्री.मुंडे यांच्यासह आ. संदीप भैय्या क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मा.आ.सुनील धांडे, मा.आ. सय्यद सलीम, शिवाजी सिरसाट, जि प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांसह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा आरोग्य विभागास या काळात बळकटी मिळाली आहे. जिल्ह्यात काम सुरू असलेल्या पैकी ८ ऑक्सिजन प्लांट पूर्णत्वाकडे जात असून, याव्यतिरिक्त विविध आधुनिक सामग्री जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *