सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम प्राधान्याने करावे .

ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर पोलीस वसाहतींच्या नवीन बांधकामाबाबत कार्यवाही करावी

मुंबई दि. 6 : सातारा जिल्ह्याचे वाढते नागरीकरण व लोकसंख्या लक्षात घेता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्राधान्याने करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या कामात सुसूत्रता येईल तसेच ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर या ठिकाणच्या पोलीस वसाहतींच्या बांधकामाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नवीन इमारत व सातारा जिल्ह्यातील पोलीस वसाहतींच्या नवीन बांधकामाबाबत गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी बैठकीला अपर पोलीस महासंचालक, नियोजन व समन्वय संजय वर्मा, अति. महासंचालक, गृहनिर्माण अर्चना  त्यागी, सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, वित्त विभागाचे अवर सचिव श्री.कातकाडे उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सध्याच्या इमारतीचे बांधकाम हे सन 1913 मधील ब्रिटीशकालीन असून ही इमारत तत्कालीन गरजेनुसार बांधण्यात आलेली आहे. सध्या सातारा जिल्ह्याचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या या बाबी विचारात घेऊन जिल्हास्तरावर सुसज्ज अशी पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत असणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या मालकीच्या असलेल्या सातारा येथील मल्हारपेठ येथे उपलब्ध जागेत नवीन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित करण्यात यावे.तसेच सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर या ठिकाणी पोलीस वसाहतींचे बांधकाम होणे आवश्यक आहे. पोलीस वसाहतींचे काम करण्याबाबतही कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना राज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *