मुदतठेव रकमेतून बालकांनी त्यांच्या पालकांची स्वप्ने साकारावी.

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र व मुदतठेव प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम.

बुलडाणा,  दि. १९ : कोविडच्या साथीने जगासह, देश, राज्य व जिल्ह्यातही थैमान घातले होते. कोविडचा काळ हा अत्यंत हलाखीचा होता. या काळात नको असतानाही अनेक गोष्टी कराव्या लागल्या. या साथीत अनेकांनी आपले आप्तेष्ट, आई – वडील, मित्र गमावले. अशा परिस्थितीत कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेले मुले यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाने अशा बालकांचे भविष्य घडविण्यासाठी ५ लक्ष रूपये मुदतठेव देण्याचा निर्णय घेतला. तरी शासनाने दिलेल्या मुदतठेव रकमेतून अशा बालकांनी आई – वडीलांची त्यांच्या विषयी असलेली स्वप्ने साकारावी, असा आशावाद पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज व्यक्त केला.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र आणि ५ लक्ष रूपये मुदतठेव रक्कम प्रमाणपत्राचे वितरण आज 18 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती कस्तुरे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी आदी उपस्थित होते.

कोरोना काळात लॉकडाऊन हा शब्द पहिल्यांदा माहिती पडल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले,  या काळात सार्वजनिक ठिकाणे बंदच होती. कोविडवर मात करण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने लसीकरण वाढविण्यासाठी कवच कुंडल मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत लसीकरण करून घ्यावे. लसींचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले.  ते पुढे म्हणाले, कोरोना काळात अनाथ, एक पालक झालेल्या बालकांना कायमस्वरूपी मदत व्हावी, याकरीता शासनाने 5 लक्ष रूपयांची मुदतठेव दिली आहे. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांना ५ लक्ष रूपयांची मुदतठेव देण्यात आली. तरी या व्यतिरिक्तसुद्धा अनाथ बालके, एक पालक असलेली बालके जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या संबंधित विभागाने शोध घ्यावा. त्यांच्यासाठी सुद्धा शासन मदत करणार आहे.

प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मारवाडी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले कोरोना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ४१४ बालके एक पालक किंवा दोन पालक गमावलेली आहेत. अशी अनाथ बालके असल्यास त्यांची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते १३ अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र व ५ लक्ष रूपये मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोविड काळात अनाथ बालकांना सहकार्य करणारे ॲड मिरा बावस्कर, डॉ. अश्विनी शेवाळे, अदिती अर्बन बँकेचे संचालक सुरेश देवकर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन सरीता जाधव यांनी, तर अनाथ बालकांची माहिती व आभार प्रदर्शन बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले. कार्यक्रमाला अनाथ बालके, त्यांचे पालकमत्व स्वीकारलेले कुटूंबीय, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *