सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया आजारासाठी नागपुरात केंद्र उघडणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर दि. २२ : सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया या आजारावर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार व्हावे, यासाठी केंद्र उघडण्यात यावे, असा निर्णय सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज घेतला. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात समिती गठित करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या सिकलसेल संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी विमला आर., वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, डागा हॉस्पिटल, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वी देखील यासंदर्भात प्रयत्न करण्यात आले होते, मात्र यावेळी एकछत्री प्रकल्प उभारण्याकडे लक्ष वेधण्याचे सांगितले.

सर्व तज्ज्ञांनी एकत्रित येत या गंभीर आजाराला एका छताखाली सर्व उपचार पद्धती मिळतील अशी आखणी करावी. नागपूर शहर व आसपास मोठ्या प्रमाणात या संदर्भातील रुग्ण आहेत. सध्या उपलब्ध असणाऱ्या सुविधा या अपूर्ण आहेत. विस्कळीत आहेत. काही सुविधा डागा हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. तर काही उपचार यंत्रे सध्या बंद आहे. त्यामुळे या रुग्णांकडे लक्ष दिले जात नाही. यासाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी व उपचार पद्धती एकाच ठिकाणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सिकलसेल सोसायटीने आज केली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया या तीनही आजारा संदर्भातील तज्ज्ञ डॉक्टर यासंदर्भातील जन्मापूर्वीचे निदान, जन्मानंतरचे उपचार, विविध चाचण्यांची सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची २४ तास उपलब्धता, अशा पद्धतीचे एक केंद्र नागपूरमध्ये सुरू करण्यात यावे. यासाठीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यासाठीचे निर्देश त्यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधिर गुप्ता यांच्या नेतृत्वात तज्ज्ञांची समिती गठीत करून सहा आठवड्याच्या आत यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रस्तावामध्ये विदेशात उभारण्यात आलेल्या अशा प्रकारच्या व्यवस्थेचा देखील सहभाग असावा. मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, याची निकड देखील यामध्ये नमूद करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *