विपरीत परिस्थितीत उत्तम गुणांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने उच्च शिक्षणासाठी मटा वाचकांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. या विद्यार्थ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे प्रातिनिधिक स्वरुपात ‘मटा हेल्पलाईन विद्यार्थी धनादेश’ देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
विद्यादान हा एक यज्ञ आहे. महाराष्ट्र टाइम्सने चौदा वर्षांपासून हेल्पलाईनच्या माध्यमातून केलेल्या विद्यादानाच्या या यज्ञामुळे जवळजवळ ५०० होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तेवत आहे. हेल्पलाईनचे हे कार्य अद्भुत, प्रशंसनीय आहे. मटाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे जीवन देऊन समाजापुढे एक चांगले उदाहरण प्रस्तुत केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
निस्वार्थ भावनेने वाचकांनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश पडला आहे. परमेश्वराला आपण पाहू शकत नाही तसेच ज्या वाचक – दात्यांनी आपले नाव प्रकाशात येऊ न देता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली ते देवरुपच आहेत असे सांगत राज्यपालांनी सर्व वाचक-दात्यांचे कौतुक केले.