अमरावती, दि. २६ : गुरूकुंज मोझरी आश्रमाचा पावन परिसर, गुरुदेवभक्तांनी गायिलेली सुमधूर भजने, आसमंत निनादून सोडणारे प्रार्थनेचे सूर अशा मंगलमय वातावरणात मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५३ वा पुण्यतिथी सोहळा पार पडला.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी प्रार्थनेत सहभागी होऊन राष्ट्रसंतांना वंदन केले. आमदार बंटी भांगडिया, सुरेंद्र भुयार, पुष्पाताई बोंडे, आश्रमाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सचिव जनार्दन बोथे यांच्यासह अनेक गुरुदेवभक्त यावेळी उपस्थित होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सोहळा न करता मर्यादित गुरूदेवभक्तांच्या उपस्थितीत पुरेशा दक्षतेसह प्रार्थना व वंदन कार्यक्रम झाला.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळाला वंदन केले. त्यानंतर आश्रमात आयोजित प्रार्थनेत सहभाग घेतला. राष्ट्रसंतांच्या अनेकविध रचनांसह विविध धर्मांच्या प्रार्थना यावेळी सादर करण्यात आल्या. भजन आणि प्रार्थनेच्या मंगलमय सूरांनी आसमंत निनादून गेले होते. समस्त गुरुदेवभक्त प्रार्थनेत तल्लीन होऊन गेले होते. जगावरील कोरोनासारखी अरिष्टे दूर होवोत, सर्वत्र शांतता व समृद्धी नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. परिसरातूनही अनेक गुरुदेवभक्त यावेळी उपस्थित होते.