अकोला,दि.२९- महिलांकडे उपजत शहाणपण असते. महिला सक्षम होऊन त्यांना आर्थिक साक्षरता यावी. ही साक्षरता आली की महिलांचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी आज डाबकी जहांगीर येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर या होत्या. गोट बँक ऑफ कारखेडाच्या डाबकी जहांगीर येथील शाखेचे उद्घाटन व स्त्री धन शेळी वाटप योजनेचा शुभारंभ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या की, शेळी पालनातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळतं, हे सर्वश्रुत आहे. दोन वर्षात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमात ‘स्त्री धन शेळी वाटप’, हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम होय. माविमच्या मार्फत शेळीच्या दूध विक्री व प्रक्रिया यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. याबाबत पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास विभाग यांचाही सहभाग घेण्याचे नियोजन आहे. महिला सक्षम झाली तर अत्याचाराचे प्रमाण कमी होते. महिलांकडे उपजत शहाणपण असते. महिला सक्षम होऊन त्यांना आर्थिक साक्षरता यावी, असे त्यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.
या प्रसंगी, माविमच्या अध्यक्ष श्रीमती ठाकरे म्हणाल्या की, महिला मूलतः कणखर असते.माविमने बँक ऑफ महाराष्ट्रशी ११ टक्के व्याजदराने बचत गटाने कर्ज देण्याबाबत करार केलाय, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गोट बँक ऑफ कारखेडाच्या डाबकी जहांगीर च्या शाखेचे उद्घाटन करून त्यातील शेळ्यांची पाहणी त्यांनी केली. शेळीपालक मनोहर डहाके, दादाराव हटकर यांचा तसेच विद्या वानखडे या माविमच्या यशस्वी शेळीपालक महिलेचा सत्कार ॲड. श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा सनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, गोट बँक ऑफ कारखेडाच्या संस्थापक अध्यक्ष नरेश देशमुख, माणिकराव अगमे, पशु विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.पावशे, पशुसंवर्धन विभाग उपसंचालक डॉ.बावने यांची यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक नरेश देशमुख यांनी केले. तसेच सूत्रसंचालन मनोज देशमुख व आभार प्रदर्शन माणिकराव अगमे यांनी केले. या कार्यक्रमास माविमच्या बचत गटाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.