अहमदनगर, दि. २८ :- राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी पारनेर तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले ग्रामविकासाचे आजपर्यंतचे सर्व उपक्रम व लोकसहभागावर आधारित नाविन्यपूर्ण कामाची माहिती जाणून घेतली.
राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी स्वर्गीय नवलभाऊ मीडिया सेंटरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी गावातील विकासकामांची माहिती, अण्णा हजारेंच्या कार्याची माहिती सांगणाऱ्या छायाचित्र दालनाची पाहणी करुन माहिती घेतली. त्यानंतर जनआंदोलन संग्रहालयाला भेट देऊन त्यांनी १९८० ते २०२० पर्यंतच्या ४० वर्षातील अण्णा हजारेंच्या विविध आंदोलनाच्या इतिहासाची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडुन जाणून घेतली. तत्पुर्वी त्यांनी गावाच्या सुरूवातीला असलेल्या कोहिणी नाला बंडींग (प्लास्टीक अस्तरीकरण), पाणलोट कामाची, गॅबियन कम्पोजिट बंधारा या उपक्रमांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. त्यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला व गावाच्या विकासाबाबत त्यांची मते जाणून घेतली.
गावाच्या भेटीनंतर राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी शासकीय हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण केले.