गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड दिवाळीत प्रकाशमय होणार.

 

आशिष शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; गोकुंदा वासियांनी मानले आभार.

किनवट प्रतिनिधी सी. एस. कागणे,
किनवट : ०१ :  येथील गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये बऱ्याच महिन्यांपासून पथदिवे व खांबावरचे बल्ब नव्हते. म्हणुन हि समस्या घेऊन जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी नुकतेच गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांची भेट घेऊन लवकरात लवकर सर्व वार्डमध्ये पथदिवे व खांबावरचे बल्ब लावण्यात यावे अशी मागणी केली होती. याचा मुहूर्त आता ग्रामसेवकांनी ऐन दिवाळीला काढला असुन, आत सर्व वार्ड मध्ये पथदिवे व खांबावरचे बल्ब लावण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच सर्वच वार्ड प्रकाशमय होणार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, किनवट चे उपशहर अशी ओळख असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये बऱ्याच दिवसांपासून पथदिवे व सर्व खांबावरचे बल्ब नव्हते. यांमुळे गोकुंदा येथील सर्व नागरिकांना सायंकाळी व रात्री या अंधारामुळे भरपूर समस्यांना सामोरे जावे लागत होते. अशा अंधारामुळे गोकुंदा येथे चोरीचे व लुटमारीचे प्रमाण वाढले होते. तसेच विद्यार्थ्यांना सायंकाळी शाळेतुन व क्लासेस मधुन घरी येताना अंधारात जिव मुठीत घेऊन घरी यावं लागतं होते. या सर्व समस्या सांगण्यासाठी जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांची भेट घेतली व त्यांना या सर्व समस्या सविस्तर सांगितल्या व लवकरात लवकर सर्व वार्ड मध्ये पथदिवे व खांबावरचे बल्ब लावण्यात यावे अशी मागणी केली. यांवर ग्रामसेवकानी आठ दिवसांमध्ये सर्व वार्ड मध्ये पथदिवे लावण्यात येईल असे आश्वासन आशिष शेळके यांना दिले होते. याबाबतच्या बातम्या बऱ्याच वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामसेवक खरच आठ दिवसांत सर्व वार्ड मध्ये पथदिवे लावतील का, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून होते. परंतु काही कार्यालयीन अडचणी मुळे ग्रामसेवकांनी आठ दिवसांत तर नाही, पण पंधरा दिवसांनी पथदिवे लावण्याचे काम सुरू केले आहे. आता लवकरच सर्व वार्ड प्रकाशमय होणार आहेत.
आशिष शेळके यांनी यांवर बोलताना सांगितले की, ग्रामसेवक यांनी मला दिलेले आश्र्वासन पाळुन पथदिवे लावण्यास सुरुवात केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. याच प्रकारे आता नाली साफसफाई, कचऱ्याचा ढीग व घंटा गाडी या समस्या देखील लवकरात लवकर दुर कराव्या अशी ग्रामसेवक यांना मागणी करतो. यापुढे देखील अशाच प्रकारे कर्तव्याशी एकनिष्ठ राहुन प्रविण रावळे यांनी काम करावे अशे आशिष शेळके म्हणाले.
ऐन दिवाळीत गोकुंदा ग्रामपंचायतील सर्व वार्ड प्रकाशमय होणार आहेत त्यामुळे सर्व गोकुंदा मधील सर्व नागरिक, लहान मुले-मुली व विद्यार्थी आनंदी झाले आहेत. पथदिव्यांची ही समस्या कुठल्याच ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत दुर केली नव्हती, पण जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांच्या कार्यांमुळे फक्त पंधरा दिवसांत पथदिव्यांची समस्या दुर झाली आहे, त्यामुळे सर्व गोकुंदा वासियांनी आशिष शेळके यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *