औरंगाबाद,दि.९ : महिला सरपंचानी पदाला न्याय देण्यासाठी व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती घेऊन गावागावात विकास कामांना गती द्यावी. पुरोगामी महाराष्ट्रात अनेक समाजसुधारकांच्या विचारातून विविध चालीरिती, प्रथा, परंपरा दूर करुन स्त्री शिक्षण व तिच्या विकासासाठी सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिल्याने समाजकारण व राजकारणात महिला सरपंच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्या आहेत. यासाठी या महिला सरपंच परिषदेच्या माध्यमातून वितरीत करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचा उपयोग महिला सरपंच विविध योजनां राबविण्यासाठी करतील, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महिला सरपंच परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
महिला सरपंचानी वाचन करुन विविध नियमाचा अभ्यास करावा, गावाचा कारभार मजबूतीने व विश्वासाने चालवण्यासाठी कुटुंबातील पुरुषाने यात पती, भाऊ यांनी त्यांना सहकार्य करुन पांठिबा देणे हे तितकच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. याबरोबरच गावागावात महिला सरपंच असलेल्या गावांना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विकास योजना राबविण्यात सहकार्य व मार्गदर्शन करण्याबाबत सांगितले. यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या निधी बरोबरच पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
या कार्यक्रमास मंत्री संदीपान भूमरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार रमेश बोरनारे, आमदार अंबादास दानवे, आमदार ॲङ मनिषा कायंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, व एकूण ५२९ महिला सरपंच यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरुपात आमदार प्रशांत बंब यांनी सरपंच महिलाना उद्देशून बोलताना सांगितले की, ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणाच्या सूचना प्रत्येक महिला सरपंचानी करावी, जेणेकरुन गावाच्या विकासकामांना गती मिळेल. तसेच अतिक्रमणे टाळण्यासाठी बांधकाम परवानगी देत असताना मालकी हक्काची खातरजमा केल्याशिवाय परवानगी देऊ नये, जेणेकरुन भविष्यात गावाना इतर समस्या निर्माण होणार नाही.
आमदार संजय सिरसाट यांनी महिला सरपंचानी आपले अधिकार वापरावेत. जीवनात सरपंच पदाची मिळालेली ही संधी असून आपल मत मांडायला शिकले पाहिजे. चांगल्या व प्रामाणिक कार्यातून आपले नेतृत्व गुणाचा विकास होतो, असे यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केले यावेळी लसीकरणात औरंगाबाद जिल्ह्याचे प्रमाण वाढविण्यासाठी महिला सरपंचानी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले. महिला सरपंच परिषदेची सागंता राष्ट्रगीतानी झाली.