तमाम भाविकांची श्रद्धा वाढीस लागो आणि महाराष्ट्राची वाटचाल सर्वांगिण विकासाकडे होवो.
अलिबाग,जि.रायगड,दि.१३ :- तमाम भाविकांची श्रद्धा वाढीस लागो आणि महाराष्ट्राची वाटचाल सर्वांगीण विकासाकडे होवो, अशी प्रार्थना श्रीगणराया चरणी आहे, असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र महाड येथे केले.
अष्टविनायक क्षेत्रापैकी महाड येथील सुप्रसिद्ध श्री गणेश मंदिरास भेट देण्यास आल्या असताना त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रेखा ठाकरे, संतोष विचारे, गणपत पाटील,रेश्मा आंग्रे, अनिता पाटील देशमुख-दिसले, मा.उपसभापती कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सचिन शिकलकर, स्वीय सहाय्यक योगेश जाधव व किरण शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, महड देवस्थान विकास कामासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. महड फाटा ते महड देवस्थान अशा मार्गावर पथदिवे हायमास्क साठी रुपये पाच लाखाचा निधीही महड देवस्थान समितीला देण्यात येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली असून महाविकास आघाडीचे शासन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. देवस्थान अष्टविनायक आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असून अष्टविनायक देवस्थानच्या विकास आराखड्यांतर्गत लवकरच रस्त्यांची सुधारणा होण्याच्या दृष्टीनेही आवश्यक कार्यवाही केली जाईल. रस्त्यांची सुधारणा होण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाणार आहे तर देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हायलाच हव्यात, असे सांगून डॉ. गोऱ्हे यांनी खोपोली पाली मार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यामार्फत चौकशी करून या प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.तसेच पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी हा अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून देवस्थान विकास कामांसाठी आवश्यक निधी दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या भेटीदरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतःच्या आमदार मानधनातून वैयक्तिक ११ हजार रुपयांची देणगी देवस्थान समितीचे केदार जोशी, मोहिनी वैद्य यांच्याकडे सुपूर्द केली.