इतर आस्थापनांना देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २१- राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केल्यानंतर मोठ्या हॉटेल्सनी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने वापरावीत, असे आवाहन केले आहे. यास प्रतिसाद देत शॅले हॉटेल्सने घेतलेल्या पुढाकाराचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. इतर आस्थापनांनी देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शॅले हॉटेल्स मार्फत मुंबई आणि पुण्यात हॉटेल्स चालविली जातात. इलेक्ट्रिक वाहनांबाबत आखलेल्या धोरणांची शॅले चे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांनी श्री ठाकरे यांना आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत माहिती दिली. शॅले २०२५ पर्यंत आपली सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहने करणार आहे. २०२९ पर्यंत ऊर्जा उत्पादन दुप्पट करणार आहे. तर, २०३१ पर्यंत पूर्णतः नविनीकृत ऊर्जेचा वापर सुरू होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याबरोबरच रियुज, रिड्युस आणि रिसायकल या तत्वानुसार ऊर्जा, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाविषयी माहिती देऊन मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षापासून शासनामार्फत खरेदी केली जाणारी वाहनेसुद्धा इलेक्ट्रिक वाहने असतील. मुंबईत बेस्टच्या ताफ्यातील २१०० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे ते म्हणाले. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. आता मोठ्या हॉटेल्सनी इलेक्ट्रिक वाहने वापरावीत या आवाहनाला प्रतिसाद देऊन शॅले हॉटेल्सने आखलेल्या या उपक्रमाचे श्री. ठाकरे यांनी कौतुक केले.
शासनाच्या पर्यावरणासाठीच्या धोरणाचे नुकत्याच ग्लासगो येथे झालेल्या Cop26 या आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदेत पुरस्कार देऊन कौतुक केले गेले. त्याची माहिती देऊन श्री ठाकरे म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण पूरक सवयी अंगिकारणे ही पृथ्वीसाठीच नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.