मुंबई, दि. २९ : राज्यातील मराठी उद्योजकांची कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होत असल्याचा राज्याला अभिमान असून मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढत असल्याचे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेड या कंपनीचा लिस्टिंग समारंभ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघ, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई बोलत होते.
आयपीओमधील उज्ज्वल यशाबदल अभिनंदन करुन उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेडचा प्रवास हा अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. ही मराठी माणसाची कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्याचा राज्याला अभिमान आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील सक्रिय औषध घटक निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या या मराठी बांधवांच्या कंपनीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा विश्वास दाखवला याबद्दल आनंद आहे. देशात सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचा मोठा गट असून त्यांच्या वाढीसाठी मुंबई शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारणे सहज झाल्याने या लहान उद्योजकांना त्यांचे लक्ष्य गाठणे शक्य झाले आहे, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
सूचिबद्ध (Listing) कार्यक्रमांच्या माध्यमातून सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा नक्कीच उपयोग होईल. या व्यासपीठाच्या माध्यमातून सूक्ष्म, मध्यम उद्योगांना थेट भांडवली बाजारामध्ये प्रवेश करता येणार असून त्यांना भांडवलासाठी अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. परिणामी या उद्योगांवर गुंतवणूकदारांचाही विश्वास वाढत आहे. त्यामुळे सूक्ष्म आणि मध्यम उद्योग करणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून उद्योगांच्या समृद्धीसाठी समर्थन दर्शविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचेही (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी आभार मानले.