मुंबई, दि. ०१ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी २०२२ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे २०२१ हे वर्षदेखील संपूर्ण जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक असे होते. भारतातील लोकांनी शाश्वत मानवी मूल्ये, सर्व धर्मांची शिकवण व सेवाभाव यामुळे या आव्हानाला समर्थपणे तोंड दिले. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही, त्यामुळे यानंतर देखील सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपल्याला आपले राज्य सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर न्यावयाचे आहे. या दृष्टीने प्रत्येकाने राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेने व समर्पण भावनेने कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे. २०२२ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, निरामय जीवन व समृद्धी प्रदान करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.