हातावर कमावणाऱ्यांना हक्काचे घर देण्याचा आनंद : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर दि. १ : हातावर कमावणाऱ्यांना हक्काचे घर दिवास्वप्न असते. जगण्याची भ्रांत असणाऱ्या लोकांच्या घरावर छत मिळणे यासारखे समाधान नसते. प्रशासनाच्या मदतीने निराश्रितांच्या घराची स्वप्न पूर्ण होत असल्याचा हा क्षण आनंददायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील नझूल, मनपा व नागपूर सुधार प्रन्यासच्या कक्षेत येणाऱ्या झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार, नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अधिसूचित झोपडपट्टीतील नझूल जमिनीवरील झोपडपट्टीधारकांना या वेळी प्राथमिक स्वरूपात पट्टे वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जवळपास साडेतीनशे प्रस्तावित प्रकरणांना अधिकृत करण्यात येत आहे. यापैकी काही निवडक प्रातिनिधिक पट्टे धारकांना आजच्या कार्यक्रमात पट्टे वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या नवीन कोरोना प्रतिबंधक नियमानुसार केवळ ५० लोकांना या कार्यक्रमासाठी उपस्थिती मर्यादित ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे मोजक्या लोकांना पट्टे वाटप करण्यात आले. नझूल क्षेत्रातील ११०, नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत ११० व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ३० अशा एकूण १५० झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे.

मानकापूर येथील क्रीडा संकुलात या संदर्भातील भव्य आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी लाभार्थी एकत्रित येणार होते. मात्र राज्य शासनाच्या नियमाला अनुसरून काल रात्री ५० चा नियम निर्धारित करण्यात आल्यामुळे आज मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. तथापि, लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी दृकश्राव्य पद्धतीने या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी पालकमंत्र्यांनी कामाच्या शोधात शहराकडे आकर्षित होणाऱ्या गरीब जनतेला घराचा मोठा प्रश्न आहे. कसेबसे शहरात कुठे रोजगार मिळाला तर रहावे कुठे? हा प्रश्न राहतो. त्यामुळे हजारो कुटुंब पुढे निवासाचा यक्षप्रश्न उभा आहे. मागील वीस पंचवीस वर्षांपासून शहरात झोपड्यांचा प्रश्न वाढत आहे. बहुतांशी झोपड्या या केंद्र किंवा राज्य शासनाच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर आहेत. शासनाने वर्षांनुवर्षे राहणाऱ्या कुटुंबांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच आजचा सोहळा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महानगरपालिका सुधार प्रन्यास आणि महसूल विभागाने यासाठी घेतलेला पुढाकार व केलेल्या पाठपुरावा बद्दल कौतुक केले.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी देखील यावेळी संबोधित केले. गरिबांना घरे मिळणे, आयुष्यातील मोठा प्रसंग असतो. यासाठी स्वतः पालक मंत्री यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. सोबतच झुडपी जंगलाच्या प्रश्नाला निकाली काढून नागरिकांना ग्रामीण भागात देखील घरे देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार मोहन मते यांनीही झुडपी जंगलाच्या प्रश्नाला निकाली काढून नागरिकांना ग्रामीण भागात देखील घरे देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार मोहन मते यांनीही झुडपी जंगलाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.

 

महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाने घर वाटप करताना नागरिकांवर उपकार केल्यासारखे देऊ नये तर त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी सकारात्मकपणे पुढे यावे, असे आवाहन केले. तानाजी वनवे यांनी थांबलेल्या या घर वाटप प्रक्रियेला पालकमंत्र्यांनी गती दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले. सूत्रसंचालन तहसीलदार चैताली सावंत यांनी तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *