आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व कोविड -19 बाधित रूग्णांसाठी क्षयरोग (टीबी) तपासणी आणि सर्व क्षयरोग रुग्णांसाठी कोविड -19 तपासणी करण्याची शिफारस केली आहे
टीबी-कोविड आणि टीबी-आयएलआय/सारीची दोन्ही प्रकारे तपासणीच्या गरजेचा पुनरुच्चार करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने विविध सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जारी केली
टीबीच्या रुग्णवाढीचा संबंध कोविड -19 शी जोडण्यासाठी पुराव्याचा अभाव
कोविड -19 संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) प्रमाण अचानक वाढल्याचे आढळून आले असून डॉक्टरांकडे दररोज सुमारे डझनभर असे रुग्ण येत असल्यामुळे त्यांनाही काळजी वाटत आहे असा आरोप काही माध्यमांनी केला आहे.
हे स्पष्ट करण्यात आले आहे की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व कोविड -19 बाधित रूग्णांसाठी क्षयरोग (टीबी) तपासणी आणि सर्व क्षयरोग रुग्णांसाठी कोविड -19 तपासणी करण्याची शिफारस केली आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशांना ऑगस्ट 2020 पासून टीबी आणि कोविड -19 रुग्ण शोधण्यासाठी आणि उत्तम देखरेखीसाठी प्रयत्नांमध्ये समन्वय राखण्यास सांगितले आहे.
त्याशिवाय टीबी-कोविड आणि टीबी-आयएलआय/सारीच्या दोन्ही पद्धतीने तपासणी करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विविध सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेश त्याची अंमलबजावणी करत आहेत.
कोविड -19 संबंधित निर्बंधांच्या परिणामामुळे, 2020 मध्ये क्षयरोगाचे निदान झालेल्यांच्या अधिकृत नोंदणीत सुमारे 25% घट झाली होती, मात्र हा परिणाम कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून ओपीडीमध्ये तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे तसेच सर्व राज्यांकडून समाजात सक्रिय रुग्ण शोधण्याची मोहीम राबवली जात आहे.
मात्र, कोविड -19 मुळे किंवा क्षयरोगी शोधण्याच्या अधिक प्रयत्नांमुळे क्षयरोग्यांची संख्या वाढल्याचे सांगणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.
क्षयरोग (टीबी) आणि कोविड -19 हे दोन्ही आजार संसर्गजन्य म्हणून ओळखले जातात आणि ते प्रामुख्याने फुफ्फुसांवर हल्ला करतात आणि खोकला, ताप आणि श्वास घेण्यात त्रास यासारखे लक्षणे आढळतात, जरी क्षयरोगाचा इन्क्युबेशन कालावधी मोठा असतो आणि रोगाची सुरुवात हळूहळू होते या तथ्यातून क्षयरोग (टीबी) आणि कोविड -19 हे दोन्ही आजार अधिक ठळकपणे अधोरेखित करता येतात.
याशिवाय क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू मानवांमध्ये सुप्त अवस्थेत असतात आणि जेव्हा एखाद्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा या जंतूंची वेगाने वाढ होण्याची शक्यता असते. कोविडनंतरच्या परिस्थितीत देखील हे लागू होते जेव्हा एखाद्या व्यक्तीची त्या विषाणूमुळे किंवा उपचारामुळे, विशेषत: स्टिरॉइड्स सारख्या रोगप्रतिबंधक औषधामुळे देखील प्रतिकारशक्ती कमी होते.
सार्स-सिओव्ही -2 संसर्ग झालेल्या व्यक्तीला सक्रिय क्षयरोगाचा अधिक धोका संभवतो, कारण क्षयरोग हा काळ्या बुरशीसारख्या संधीसाधू संसर्ग आहे.