केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांसाठी दिल्लीहून रवाना होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पहिल्या तुकडीला निरोप देणार
येत्या एका आठवड्याच्या कालावधीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी भारतातून टोकियोला रवाना होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पहिल्या तुकडीचा औपचारिक निरोप समारंभ आज नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार आहे. 54 धावपटू, मदतनीस कर्मचारी वर्ग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधी अशा 88 जणांच्या या पथकाला केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्याद्वारे औपचारिक निरोप दिला जाईल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर ध्रुव बात्रा, संघटनेचे महासचिव राजीव मेहता आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तिरंदाजी, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ज्युडो, जिम्नॅस्टिक्स आणि भारोत्तोलन या क्रीडाप्रकारांतील स्पर्धक खेळाडू आणि त्यांचा मदतनीस कर्मचारीवर्ग आज नवी दिल्ली येथून रवाना होतील. या मध्ये हॉकीचे पथक सर्वात खेळाडू असलेले पथक आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, निरोप समारंभाला उपस्थित राहणाऱ्या सर्व मान्यवरांची कोविड चाचणी करण्यात येईल. या चाचणीनंतर ज्यांचे ‘कोविडचा संसर्ग झालेला नाही’ असे अहवाल येतील तेच या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या सुरक्षित शारीरिक अंतर पालनाच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी 127 भारतीय खेळाडू पात्र ठरले आहेत. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या 117 भारतीय खेळाडूंच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या विक्रमी ठरली आहे.