लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला गती देईल अशा बांबूची या वर्षात पाच हजार एकरवर लागवड करणार – पालकमंत्री अमित देशमुख

मांजरा नदीचा जिल्ह्यातील काठ हिरवा होणार

जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची रिफायनरी उभं करण्याचा प्रयत्न

बांबू लागवडीत राज्याला दिशा देण्याचे काम लातूर जिल्हा करेल

बांबू बरोबर खजूर, ऑलिव ट्री बाबतही जिल्ह्यासाठी पडताळणी सुरु

लातूर प्रतिनिधी, दि.०२ :-  लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला गती देवू शकेल अशा बांबूची या वर्षात पाच हजार एकरवर बांबू लागवड करणार असून येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्वावर बांबू पासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज केली.
लोदगा येथील देशातल्या पहिल्या बांबू टिशू कल्चर तयार करणाऱ्या “अलमॅक बायोटेक लॅब ” च्या दुसऱ्या टप्याच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. अभिमन्यू पवार,माजी आमदार आणि या प्रकल्पाचे प्रमुख पाशा पटेल, महाराष्ट्र बांबू बोर्ड, औरंगाबादचे संचालक पी. बी. भालेराव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्त्तात्रय गवसाने,आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ संजीव करपे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी, अभिजित साळुंखे तसेच विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कृषीचं भविष्य बदलवू शकणारा बांबूचा पथदर्शी प्रकल्प लातूर जिल्ह्यातून होत असल्याचा आनंद व्यक्त करून येत्या काळात शेतकरी फक्त “अन्नदाता नव्हे तर ऊर्जा दाता” बनणार असल्याच्या देशाचे रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाक्याचा अर्थ येत्या काळात सत्यात उतरू शकतो त्यामुळे लातूर जिल्ह्यात या वर्षी पाच हजार एकरवर बांबू लागवड करुन नजिकच्या काळात सहकार तत्वावर देशातली पाहिली रिफायनरी लातूरला उभा करु अशी ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.

भारताच्या ईशान्य भागात आसाम मध्ये नुमालीगड येथे सर्वात मोठी बांबू इथेनॉल रिफायनरी उभी राहत आहे. ती रिफायनरी आपल्यासाठी मोठी आशादायी ठरेल असे सांगून लातूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्या काळी सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग उभं करण्यासाठी चालना दिली. आज सोयाबीन हब म्हणून लातूर जिल्हा देशभरात ओळखला जात असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

लातूर सोयाबीनची जागतिक बाजार पेठ

आज जगभरातील सोयाबीनचे भाव लातूर मध्ये ठरतात हे अभिमानाची बाब असून ही सगळी किमया लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असल्याची भावना पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविली. येत्या काळात जिल्ह्यात कृषी मध्ये क्रांतीकारक बदल घडून येतील हे ओळखून आपण लातूर विमानतळ ” एअर कार्गो, ड्राय इन लँड ” पोर्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे, त्याचा आम्ही सर्वजण पाठपुरावा करत असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

बेंगलोर विमानतळावर बांबू पासून भव्य इमारत बनत आहे त्यासाठी व्हियतनाम वरून बांबू मागविला जातो आहे,असा बांबू भविष्यात आपण पिकवू असा विश्वास व्यक्त करून बांबू बरोबर खजूर, ऑलिव ट्री लागवडीबाबतही पडताळणी करतो आहोत. “जे नवं ते लातूरला हवं” हे विलासराव देशमुख साहेबांचा मंत्र आपण पुढे घेऊन जाऊ या अशी भावनिक सादही यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिली.

माजी आ.पाशा पटेल यांचे कौतुक

पाशा पटेल ज्या तडफेने बांबू मिशनसाठी काम करत आहेत ते कौतुकास्पद असून हे मिशन वाढविण्यासाठी आम्ही सर्वोत्तपरी प्रयत्न करु अशी ग्वाही पालकमंत्री यांनी यावेळी दिली.

देशातील बांबूचा ब्रँड म्हणून पाशा पटेल यांची ओळख होत असून आपण त्यांच्या या शेतकरी हिताच्या कामाला मदत करु असे आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आ. पाशा पाटील यांनी केले. त्यावेळी त्यांनी लोदगा येथील अलमॅक बायोटेक लॅब देशात पहिली बांबू वरली टीश्यू कल्चर लॅबरोटरी असून आज घडीला एक तासात ५ हजार रोपटे तयार होतात. येत्या काळात या लॅबरोटरीतून १५० कोटी रोप तयार करण्यात येतील आणि पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होतील असे सांगून त्यांनी बांबूचे महत्व विशद केले.

अलमॅक बायोटेक लॅबच्या उदघाट्नापूर्वी जागतिक कीर्तीचे बांबू तज्ञ संजीव करपे यांनी जगभरातील बांबू, बांबू पासून काय काय बनवू शकतो ते भारतात बांबूला अत्यंत पोषक वातावरण असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यापुढे केलेल्या सादरीकरणात त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *