नागपूर दि. 20 : हिरव्या नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा म्हणून इंदिरा गांधी जैवविविधता उद्यान लवकरच मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक परवानग्या अंतिम टप्प्यात असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आज या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग नागपूर डॉ. भारत सिंग हाडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे आदी उपस्थित होते
या बैठकीत प्रकल्पाच्या प्राथमिक अडचणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. या परिसरात योग्य ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याकरिता वनविभागाने हिरवी झेंडी दिली आहे. महानगरपालिकेने देखील कार्यपूर्तीची तयारी दाखविली आहे, असे या बैठकीत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नगर वन उद्यान तयार करण्याकरता दोन भागांमध्ये काम करण्याचे ठरले आहे. प्रथम भागामध्ये रोपवन करणे, रोपवन सभोवताल फेंसिंग करणे, नगर वन उद्याना सभोवताल संरक्षण भिंत बांधणे, पाण्याची टाकी तयार करणे,टॉयलेट बांधणे याकरिता विशेष प्रवेशद्वार तयार करणे, इत्यादी कामे करण्याचे नियोजन असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
यासाठीच्या आवश्यक निधीची तरतूद देखील वनविभाग व जिल्हा प्रशासनामार्फत केली जाणार आहे. नागपूरसाठी हे जैवविविधता उद्यान नवी ओळख ठरेल अशी आशा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
ग्रंड एज्युकेशन सोसायटी संदर्भात न्यायालयात बाजू मांडण्याचे निर्देश
ग्रंड एज्युकेशन सोसायटी नागपूर मौजा इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र कामठी रोड नागपूर या संस्थेच्या श्रेणी वर्धनाकरिता जागा अनुदानित करण्याबाबतचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आजच्या अन्य एका बैठकीत दिले.
सध्या यासंदर्भात न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणात शासनाची बाजू देखील मांडली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे ,शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते.