करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम भोगलेल्या आणि सामना करणाऱ्या ब्रिटनमधून एक दिलासादायक आनंदाची बातमी आली आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचई) जमा केलेल्या आकडेवारीतून नवा दावा करण्यात आला आहे करोनाची एकदा लागण झाल्यानंतर दुसऱ्यांदा बाधा होण्याचा धोका कमी असल्याचे पीएचईने म्हटले.
पीएचईने गुरुवारी प्रसिद्ध अहवालानुसार, दुसऱ्यांदा करोनाची बाधा झालेल्यांची आता संख्या कमी आहे. इंग्लंडमध्ये करोनाची सुरूवात झाल्यानंतर ३० मे २०२१ पर्यंत करोनाची दुसऱ्यांदा बाधा झालेल्यांची संख्या १५ हजार ८९३ इतकी आहे. या कालावधीत इंग्लंडमध्ये ४० लाखजणांना करोनाची बाधा झाली होती तर, दुसऱ्यांदा करोनाची लागण झालेल्या बाधितांचे प्रमाण एकूण बाधितांच्या तुलनेत ०.३९७ इतकेच आहे.
वृत्तसंस्था ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीएचईचे स्ट्रॅटेजिक डायरेक्टर डॉ. सुसान हॉपकिन्स यांनी सांगितले की, करोना संक्रमणाची बाधा झाल्यानंतर दुसऱ्यांदा संसर्ग होईल का, याची काळजी नागरिकांना आहे. अशा स्थितीत दुसऱ्यांदा करोनाची लागण होण्याचा धोका कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
करोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर संसर्ग होऊ शकत नाही, असा दावा करता येणार नसल्याचेही हॉपकिन्स यांनी स्पष्ट केले. मात्र, करोना संसर्गाची लागण न होण्याची शक्यता कमी करण्यासाठी लशीचे दोन्ही डोस आणि कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. करोनाची बाधा झालेल्यांवर लशीचा किती आणि कसा परिणाम झाला आहे याबाबतचे संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले .