करचुकवेगिरी प्रकरणी दोघांना सुरत येथून अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई

४५० कोटींहून अधिक रकमेची बोगस बिले जप्त; रु. १११ कोटींची करचुकवेगिरी तपासात उघड

मुंबई, दि १३ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देत फिरत असलेल्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, दि. १० फेब्रुवारी, २०२२रोजी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून ४५० कोटींहून अधिक रकमेची बोगस बिले जप्त करण्यात आली आहेत.

मुंबई पोलिसांची आणि सुरत शहर पोलिसांची गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्यामुळे हे अभियान अथक परिश्रमांनंतर दोन दिवसाअखेरीस यशस्वीरित्या पूर्ण झाले.

मे. डॉल्फिन ओव्हरसीज [प्रोप्रायटरः श्रीमती प्रिमा म्हात्रे] आणि मे.प्राईम ओव्हरसीन [प्रोप्रायटरः श्री. संजीव सिंग] या दोन कंपन्यांनी करचुकवेगिरी केल्याची गुप्त माहिती व्यापक सर्वसमावेशक विश्लेषण प्रणालीद्वारे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाली. माहे ऑगस्ट २०२१ मध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपन्यांवर छापे टाकले असता पहिल्या दिवसापासून या दोन्ही कंपन्यांचे संचालक वैद्यकीय कारण देऊन अन्वेषणासाठी गैरहजर राहिले व त्यानंतर ते फरार झाले. विभागाच्या कोणत्याही नोटीसांना न जुमानता हे जोडपे महाराष्ट्र राज्याबाहेर पळून गेले. या जोडप्याने इतर व्यक्तिंच्या नावे बोगस कंपन्या काढून त्याद्वारे साधारण रुपये ४८२ कोटी इतक्या रकमेची बोगस बिले प्राप्त करून रु. १११ कोटी इतक्या प्रचंड मोठ्या रकमेची करचुकवेगिरी केल्याचे तपासात दिसून आले.

प्रकरणाचे गांभीर्य पाहता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने मुंबई पोलिसांच्या विशेष व सातत्यपूर्ण मदतीने व माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन या जोडप्याचा ठावठिकाणा शोधून काढला.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाचे व मुंबई पोलिसांचे पथक तात्काळ रात्रीच पुढील कार्यवाहीसाठी सुरतला रवाना झाले. सुरत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अत्यंत भरीव मदतीने व मुंबई पोलीस दलातील माहिम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या जोडप्याला सुरत येथे त्यांनी भाड्याने घेतलेल्या आलिशान फ्लॅटमधून ताब्यात घेतले गेले. सुरत येथून मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या जोडप्यास शुक्रवारी पहाटे मुंबई येथे आणले गेले.

मुंबई येथे न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे नियोजन व अंमलबजावणी राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण-ब) श्रीमती संपदा मेहता, राज्य कर उपायुक्त विनोद देसाई, सहायक राज्य कर आयुक्त ऋषिकेश वाघ, राज्य कर अधिकारी श्रीमती स्वाती शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली.

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने परराज्यातून व इतक्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपीस अटक करण्याची ही विभागाच्या इतिहासातील पाहिलीच वेळ आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तिंना या घटनेमुळे जरब बसली असून, महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग, पोलीस प्रशासनाच्या सक्षम सहकार्याने धडक कारवाई भविष्यातही अशीच चालू ठेवेल, असा चोख संदेश करदात्यांस देण्यासही विभाग यशस्वी ठरला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *