ब्रम्हपुरीतील शासकीय रुग्णालयात मिळणार अद्ययावत सोयीसुविधा

चंद्रपूर, दि. ०२ मार्च :- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील रूग्णांना अनेकदा गंभीर आजाराच्या उपचारासाठी चंद्रपूर येथे जावे लागते. रुग्णांची ही अडचण लक्षात घेत त्यांना दिलासा देण्यासाठी ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालय सर्वसोयी सुविधांनी अद्यावत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगरसेवक विलास विखार, न.प. आरोग्य सभापती प्रीतीश बुरले, नगरसेवक महेश भर्रे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, बंटी श्रीवास्तव, मुन्ना रामटेके आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालयात यावर्षी ट्रामा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयु युनीट सुध्दा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही, असा विश्वास देतो, असे ते म्हणाले.

यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी चंद्रपूर येथे जावे लागत होते. जाणे-येणे करण्यासाठी त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना स्थानिक स्तरावर प्रमाणपत्र देण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी येथे काही दिवसांपूर्वी दिव्यांग तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यातील १६० दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जिवने यांनी केले. संचालन डॉ. कामडी यांनी तर आभार डॉ. पटले यांनी मानले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ खंडाळे, डॉ.इंगळे, डॉ. अब्दुल रब शेख, डॉ. नागमोती, डॉ. मेंढे, डॉ. सिडाम, डॉ. नाकाडे, डॉ. स्नेहल कहुरके, डॉ. खरकाटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *