मुंबई, दि. १० : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे होळीपूर्वीच भरा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची सद्यस्थिती तसेच होळीनिमित्त वाढणारी रहदारी व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नवघरे, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री.शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता राजभोज आदी उपस्थित होते. महामार्ग सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, कोकणचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होळीनिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर वाढणाऱ्या वाहतुकीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची घोषणा अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या महामार्गावरील खड्डे होळीपूर्वी भरण्याचे तसेच निर्माणाधीन पूल व रस्त्यांच्या बाजूला असलेले वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिले. होळी दरम्यान या महामार्गावर पोलीस विभागाचे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जाईल, अशी माहिती कोकणचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी बैठकीत दिली.