अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री -छगन भुजबळ
मुंबई, दि. १२ : गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये सहकार भांडार, युनिट क्र. २ मध्ये अनधिकृतपणे साठा केलेला तांदूळ आणि गहू पोलिसांनी जप्त केला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या भागात असे प्रकार घडत असल्यास पोलिसांची मदत घेऊन चौकशी करण्यात येईल आणि यातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
जालना, कोल्हापूर तसेच मुंबईतील शिधावाटप केंद्रावर धान्याच्या काळ्या बाजाराबाबत विधानसभा सदस्य संतोष दानवे, पराग शाह आदींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अनधिकृतपणे साठा केलेला ३६ हजार ६५० किलो तांदूळ आणि ४५ हजार किलो गहू आणि या गुन्ह्यातील वाहन गोरेगाव सहकार भांडार युनिट क्र. २ येथून पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जणांना अटक केली आहे. संबंधित वाहन मालकावर कारवाई करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.