शंभर हातांनी कमवा, पण हजार हातांनी दान करा

महावीर जयंतीनिमित्त राजभवन येथे ‘महावीरोत्सव’ संपन्न

मुंबई दि. १६  : तीर्थंकर महावीरांनी सत्य, अहिंसा व अपरिग्रहाची शिकवण दिली. महावीरांच्या विचारातून प्रेरणा घेत महात्मा गांधींनी सत्य व अहिंसेचा पुरस्कार करीत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक व्यक्तीने महावीरांच्या विचारांमधून प्रेरणा घ्यावी असे सांगताना ‘शंभर हातांनी कमवा, परंतु हजार हातांनी दान करा’, असा संदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिला.

भगवान महावीरांच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त (जन्म कल्याणक) राजभवन येथे गुरुवारी (दि. १४) महावीरोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला महावीरोत्सवाचे आयोजक देवेंद्र भाई, आमदार मंगलप्रभात लोढा व इतर निमंत्रित उपस्थित होते.

भारतात वेळोवेळी संत महात्म्यांनी जन्म घेऊन समाजाला दिशादर्शन केले आहे. त्यांचे उपदेश संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी असतात.  तीर्थंकर  महावीर हे पावित्र्य, त्याग, निष्ठा व समर्पणाचे प्रतीक होते. या शाश्वत मूल्यांमुळेच आज २६०० वर्षानंतर देखील लोक महावीरांचे स्मरण करतात. भगवान महावीर, गौतम बुद्ध व महात्मा गांधी यांच्या विचारांमुळेच आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी समाज कार्यासाठी शैलेंद्र घिया, जमनालाल हपावत, प्रमोद भारेल, घेवरचंद बोहरा, एम. आय. जैन व राकेश जैन नाहर यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *