विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या- जिल्हाधिकारी राहूल रेखावार

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व

कोल्हापूर, दि.२० : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापुरात कृतज्ञता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात श्री शाहू छत्रपती मिलमध्ये शाहू महाराजांच्या विचारावर आधारित विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दरम्यान आजपासून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पणन विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे तसेच कृतज्ञता पर्व समितीचे सदस्य उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य नव्या पिढी पुढे नेण्यासाठी हे कृतज्ञता पर्व आयोजित केले आहे. विविध उपक्रमांबरोबरच विकेल ते पिकेल व या संकल्पनेवर आधारित ‘जत्रा आंब्याची’ घेण्यात येत आहे. बांधावरुन थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून जत्रा आंब्याची अंतर्गत उत्पादकांच्या आंब्याला शाहू मिल येथे थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असे सांगून माफक दरात उपलब्ध केलेल्या या आंबा जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले आहे.

या आंब्याच्या जत्रेत विविध प्रजातीचा आंबा म्हणजेच देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या यांसह केंट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दुधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम आदी सह वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे या जत्रेत उपलब्ध आहेत.

तब्बल ६ मेट्रिक टन आंब्यांची विक्री: सव्वा ६ लाखांहून अधिक रक्कमेची उलाढाल

आंब्यांच्या जत्रेत १८ हून अधिक प्रजातींचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून पहिल्याच दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले. याठिकाणी १८ उत्पादकांचे १८ स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी तब्बल ६ मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली असून यातून अंदाजे सव्वा ६ लाखांहून अधिक रक्कमेची उलाढाल झाली असल्याची माहिती उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी दिली.

आंबा खरेदीसाठी पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद

आंबा खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे आंबा उत्पादक भारावून गेले.

उत्पादकांनी मानले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आभार

आंबा उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल झाल्यामुळे आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *