नागपूर, दि. २६ : विद्यार्थ्यांनी देशात करिअर घडवून आपल्या ज्ञानाचा उपयोग देश घडविण्यासाठी राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 109 वा पदवीदान दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे,, विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यावेळी उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विकासाच्या संधी देशात निर्माण होत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ आपल्या देशवासियांना कसा होईल यादृष्टीने युवकांनी विचार करावा तसेच देशात नवनिर्मितीच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे असेही यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दीक्षांत कार्यक्रमात राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा व्हिडीओ शुभेच्छा संदेश दाखविण्यात आला. विद्यापीठातील सुवर्णपदक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अमृत महोत्सवाबरोबर विद्यापीठाला 99 वर्ष पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या विविध उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यशास्त्राचे प्रा. दयाराम परतूमल लालवाणी यांना मानव विज्ञान पंडित (डि.लिट) प्रदान करण्यात आली. या पदवीदान दीक्षांत समारंभात 532 विविध विषयातील विद्यार्थ्यांना पदवी, या मध्ये सायन्स अँड टेक्नालॉजी-190, वाणिज्य आणि व्यवस्थापन-79, मानव विज्ञान – 186 व आंतर विद्या शाखा -77 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
प्रास्तविकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्तविक केले. विद्यापीठाच्या गीतामधील नेहमी खरे बोला, योग्य वागणूक ठेवा, स्फूर्तीदायक ग्रंथांचे वाचन करुन आचरणात आणा व राष्ट्राला देवरुप माना, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना स्मृतिचिन्ह देऊन विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला. गुणानुक्रमे निधी साहू यांना पाच सुवर्णपदक, नम्रता मोहोड यांना दोन तर प्रफुल्ल डोरले व जरीना झोया यांना प्रत्येकी एक सुवर्णपदक देऊन त्यांचा
सत्कार करण्यात आला.